मालेगाव महानगरपालिकेतर्फे मोसमनदी स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:19 IST2018-02-22T00:09:35+5:302018-02-22T00:19:16+5:30
महानगरपालिकेतर्फे लोकसहभागातून मोसमनदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह पोलीसदलाच्या कर्मचाºयांनी सहभाग घेतला.

मालेगाव महानगरपालिकेतर्फे मोसमनदी स्वच्छता अभियान
मालेगाव : महानगरपालिकेतर्फे लोकसहभागातून मोसमनदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह पोलीसदलाच्या कर्मचाºयांनी सहभाग घेतला. सकाळी आठ वाजेपासूनच मोसम नदीपात्रात जेसीबी, ट्रॅक्टर्ससह सामाजिक कार्यकर्त्यांचा लवाजमा अगदी वेळेतच दाखल झाला. राज्यमंत्री भुसे यांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी मोसम नदीपात्रातून घाण कचरा उचलण्यास प्रारंभ केला. जेसीबीच्या साह्याने काटेरी झुडपे काढण्यात येऊन नदीपात्राच्या दोन्ही बाजूला सपाटीकरण करून मातीचा भराव नदीपात्रात टाकण्यात आला. पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी त्यात सहभागी झाले. पोलीसदलाने सामान्य रुग्णालयाचा पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंत स्वच्छता अभियान चांगल्या पद्धतीने राबविले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, दंगा नियंत्रण पथक व सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी २० अधिकारी व १५० पोलीस कर्मचाºयांच्या पथकाने यात सहभाग घेतला. मोसम नदीपात्राच्या दोन्ही बाजूची घाण-कचरा उचलून काटेरी झुडपे काढण्यात आली. सकाळी आठ ते साडेदहा वाजे दरम्यान अडीच तास ही मोहीम सुरू होती. वर्षभर नियमितपणे मोसमनदी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून, त्यामुळे नदीतील घाण व दुर्गंधी दूर होईल, असे महानगरपालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी सांगितले.