सकाळी सामसूम, सायंकाळी धामधूम
By Admin | Updated: February 22, 2017 01:44 IST2017-02-22T01:44:29+5:302017-02-22T01:44:45+5:30
भालेकर हायस्कूल : संवेदनशील केंद्राकडे विशेष लक्ष

सकाळी सामसूम, सायंकाळी धामधूम
नाशिक : प्रभाग क्रमांक १३ मधील बी. डी. भालेकर हायस्कूल येथील संवेदनशील मतदान केंद्रावर सकाळी पहिल्या चार तासात तुरळक मतदारांनी हजेरी लावली. मात्र, शेवटच्या दोन तासांत नेहमीप्रमाणे भालेकर हायस्कूलच्या मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढली. या मतदान केंद्राकडे पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. प्रभाग १३ मधील बी. डी. भालेकर हायस्कूलमधील मतदान केंद्र हे कोणत्याही निवडणुकीत परंपरेने संवेदनशील मतदान केंद्र राहत आले आहे. या मतदान केंद्रावर अखेरच्या तासाभरात सुमारे दीड ते दोन हजार मतदार अचानक अवतीर्ण होत असल्याने दरवेळी रात्री उशिरापर्यंत त्याठिकाणी मतदानाची प्रक्रिया चालत असते. महापालिका निवडणुकीसाठी यंदा भालेकर हायस्कूलमध्ये चार बूथ मांडण्यात आले होते. मतदान केंद्रावरची आजवरची ख्याती लक्षात घेता पोलिसांनी या केंद्राकडे विशेष लक्ष केंद्रित केले होते. याठिकाणी उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. सकाळी पहिल्या दोन तासांत या मतदान केंद्रावर अवघे ४८ मतदान झाले होते. मात्र, दुपारी ४ वाजेनंतर याठिकाणी मतदारांची गर्दी जमायला सुरुवात झाली. ५.३० वाजता मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतरही काही मतदार मतदान केंद्राकडे येत होते. परंतु, ५.३० वाजता पोलिसांनी आवाराचे प्रवेशद्वार बंद करून टाकले. ५.३० वाजेपर्यंत
जे मतदार आत आले त्यांनाच मतदानाचा हक्क बजावता आला. त्यामुळे मतदानाची वेळ संपल्यानंतरही याठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)