साडेसात हजारहून अधिक विद्यार्थी प्रवेशाचा निर्माण होणार पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST2021-07-19T04:11:22+5:302021-07-19T04:11:22+5:30
नाशिक : दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर नव्या मूल्यमापन पद्धतीद्वारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात ...

साडेसात हजारहून अधिक विद्यार्थी प्रवेशाचा निर्माण होणार पेच
नाशिक : दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर नव्या मूल्यमापन पद्धतीद्वारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात विक्रमी संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परंतु, आता या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमात सामावून घेण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर निर्माण झाले आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य व विज्ञान शाखांमध्ये अकरावी प्रवेशासोबतच, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, या सर्व अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सुमारे साडेसात हजारांहून अधिक आहे. त्यामुळे या साडेसात हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावरही यावर्षीच्या प्रक्रियेविषयी कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. परंतु मागील वर्षी नाशिक शहर व जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या प्रवेशप्रक्रियेनुसार नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २५ हजार २७० जागा उपलब्ध आहेत. तर नाशिक महापालिका क्षेत्र वगळता उर्वरित जिल्ह्यातील २५० कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये ५१ हजार ८०० जागा उपलब्ध आहेत. यानुसार संपूर्ण जिल्ह्यात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ७७ हजार ५० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. तर तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी २५ तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये ९ हजार २५४ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. त्याचप्रमाणे नाशिक शहर व जिल्ह्यातील शासकीय व खासगी आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मिळून सुमारे ६६२४ विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळू शकतो. अशा एकूण ९२ हजार ९२८ विद्यार्थ्यांची नाशिक जिल्ह्यात विविध अभ्यासक्रमांना प्रवेश क्षमता आहे. तुलनेत ९२ हजार २३६ नियमित विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ९२ हजार २१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ३१८ पुनर्परीक्षार्थींपैकी ३ हजार ५८१ विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या ९५ हजार ७९१ विद्यार्थ्यांसोबतच सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचे मिळून जवळपास अडीच ते तीन हजारहून अधिक विद्यार्थी अकरावी, तंत्रशिक्षण पदविका किंवा तत्सम प्रवेशासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेच उपलब्ध जागांची तूट निर्माण होणार असून प्रत्येक जागेवर प्रवेश झाला तरी जवळपास सहा ते साडेसहा हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सामावून घेण्याच्या दृष्टीने काय तोडगा काढणार याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पॉईंटर
महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालये - ६०
महापालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश क्षमता - २५२७०
ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालये - २५०
ग्रामीण भागात अकरावीची प्रवेश क्षमता - ५१८००
तंत्रनिकेतन महाविद्यालये -२५
तंत्रशिक्षण पदविका प्रवेश क्षमता -९२५४
शासकीय आयटीआय प्रवेश क्षमता- ४९३२
खासगी आटीआय प्रवेशक्षमता - १६९२
अतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी पर्याय काय ?
नाशिक जिल्ह्यात अकरावी व तत्सम प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. यात सीबीएसई व आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचीही भर पडणार आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी मागील वर्षी प्रवेश घेऊ शकले नाहीत किंवा तंत्रशिक्षणाकडून पुन्हा अकरावी प्रवेशाकडे वळणार आहेत त्यांचीही यात भर पडणार आहे. अशा परिस्थितीत अतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागासमोर विविध शिक्षण संस्थांना तुकड्या वाढवून देण्याचा पर्याय आहे. हाच पर्याय तंत्रशिक्षण संचालनालयालाही अवंलबावा लागणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
180721\18nsk_3_18072021_13.jpg
प्रवेश प्रक्रिया