नऊशेहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त
By Admin | Updated: August 8, 2014 00:56 IST2014-08-07T22:38:33+5:302014-08-08T00:56:51+5:30
नऊशेहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त

नऊशेहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त
नाशिक : जिल्हा परिषदेत शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकांची ९२१ पदे रिक्त असून, त्यापैकी २३७ शिक्षकांच्या पदांची नियुक्ती राज्यस्तरावरून करण्यात आली आहे. त्यापैकी १४१ शिक्षकांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांना आदेश देण्यात आले आहेत, तर ५० शिक्षकांची कागदपत्रे अद्याप अपूर्ण आहेत. उर्वरित सातशेहून अधिक रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, असा ठराव जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत करण्यात आला.
केवळ शिक्षकच नाहीत तर मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यात मुख्याध्यापकांची ११२ पदे रिक्त असून, त्यात सर्वाधिक रिक्त पदे मालेगाव तालुक्यात २९, तर त्या खालोखाल निफाड-१७, येवला-१३, नांदगाव-१२ व चांदवड आणि बागलाण प्रत्येकी ११ अशी आहेत. त्याचप्रमाणे पदवीधर शिक्षकांचीही १५३ पदे रिक्त असून, त्यात सर्वाधिक पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे- मालेगाव-३२, सुरगाणा-२३, निफाड-२२ अशी आहेत. तसेच विस्तार अधिकाऱ्यांची ११, केंद्रप्रमुखांची ४१ पदे रिक्त
आहेत.
शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, असा ठरावच शिक्षण समितीच्या बैठकीत सर्वानुमते संमत करण्यात आला.(प्रतिनिधी)