नाशिक : जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्या अठराशेपेक्षा कमी झाली असली तरी निम्म्याहून अधिक उपचारार्थी रुग्ण नाशिक ग्रामीणचे आहेत. त्यात नाशिक ग्रामीणचे ९५४, तर नाशिक मनपाच्या ७६५ नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान गुरुवारी (दि.८) एकूण ९ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८४१३ वर पोहोचली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गुरुवारी १६० रुग्णांची वाढ झाली असून १७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन बाधित झालेल्या १६० बाधितांमध्येदेखील ग्रामीणच्या ९४, नाशिक मनपाच्या ५४ रुग्णांचा, जिल्हा बाह्यच्या १०, तर मालेगाव मनपाच्या २ रुग्णांचा त्यात समावेश आहे. गत पंधरवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत होणाऱ्या वाढीमध्ये नाशिक ग्रामीणमधील रुग्णांचेच प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच नाशिक ग्रामीणची उपचारार्थी रुग्णसंख्या सध्या नाशिक मनपापेक्षाही दोनशे रुग्णांनी अधिक आहे. तसेच गुरुवारी गेलेल्या ९ बळींमध्ये ५ नाशिक ग्रामीणचे, ३ नाशिक मनपा क्षेत्रातील तर १ मालेगाव मनपा क्षेत्रातील आहे. दरम्यान प्रलंबित अहवालांची संख्यादेखील ९०२ वर पोहोचली असून त्यातही नाशिक ग्रामीणचीच संख्या अधिक म्हणजे ४५२ इतकी असून नाशिक मनपा क्षेत्रातील २१८, तर मालेगाव मनपा क्षेत्रातील २३२ जणांचा समावेश आहे.
इन्फो
कोरोनामुक्तीत किंचितशी वाढ
जिल्ह्यातील कोरोनामुक्त नागरिकांचे प्रमाण ९७.४२ पर्यंत पोहोचले आहे. गत पंधरवड्यात हे प्रमाण सातत्याने सव्वासत्याण्णवच्या आसपासच राहत होते. त्यात आठवड्याच्या प्रारंभापासून अल्पशी वाढ होत गेल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात कोरोनामुक्तची सरासरी अठ्ठ्याण्णवजवळ म्हणजे ९७.९५ वर पोहोचली असून त्यानंतर जिल्हा बाह्यचे कोरोनामुक्तचे प्रमाण ९७.३६, तर मालेगाव मनपात ९६.७६ तर नाशिक ग्रामीणला कोरोनामुक्तचे प्रमाण ९६.६९ टक्के इतके आहे.