मोर्चा : गोणीमुक्त कांदा लिलाव सुरू करण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांची तहसीलवर धडक
By Admin | Updated: August 9, 2016 22:08 IST2016-08-09T22:08:02+5:302016-08-09T22:08:24+5:30
सटाण्यात कडकडीत बंद

मोर्चा : गोणीमुक्त कांदा लिलाव सुरू करण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांची तहसीलवर धडक
सटाणा : व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला असून, मंगळवारी संतप्त शेतकऱ्यांनी सटाणा शहरासह तालुका बंद पुकारून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. दोन दिवसांच्या आत शासनाने कठोर निर्णय घेऊन कांदा लिलाव पूर्ववत न केल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढवून उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रामचंद्रबापू पाटील यांनी दिला आहे.
सोमवारी शिवसेनेचे नेते अरविंद सोनवणे व शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील यांनी सटाणा शहरासह तालुका बंदची हाक दिली होती. त्याला सटाणा, नामपूर, ताहाराबाद, लखमापूर, ब्राह्मणगाव, जायखेडा येथील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद ठेवला होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी ११ वाजता शेतकरी नेते पाटील, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, शेतकरी संघटनेचे देवीदास पवार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे चारशे ते साडेचारशे शेतकऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शासन आणि व्यापाऱ्यांच्या निषेधार्थ घोषणा देत ताहाराबाद रोड या प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेला.
यावेळी काही शेतकऱ्यांनी वाहनांवर कांदा फेकून संताप व्यक्त केला. तहसील आवारात मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन रामचंद्रबापू पाटील यांनी आपल्या भाषणात सरकार आणि व्यापारी यांच्यावर तोंडसुख घेतले.
शासनाने कठोर भूमिका घेऊन तत्काळ खुल्या पद्धतीने कांदा लिलाव पूर्ववत करण्याची गरज असून, याबाबत येत्या दोन दिवसात तोडगा न काढल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येईल. त्याला शासनच जबाबदार असेल, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.
देवीदास पवार यांनी तर थेट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोनलाल भंडारी यांनाच टीकेचे लक्ष केले. माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, सुरेश बागड, शैलेश सूर्यवंशी, काका रौंदळ, अरविंद सोनवणे, पोपट सोनवणे यांचीही यावेळी भाषण झाली.
मोर्चात नानाजी दळवी, माधवराव सोनवणे, नीलेश सोनवणे, सुभाष अहिरे, मुंजवाडचे सरपंच गणेश जाधव, रत्नाकर सोनवणे, राजाराम सोनवणे, परेश पाठक, संजय पवार, प्रकाश निकम, गुलाब जाधव, दीपक रौंदळ, वसंत सोनवणे, परशराम अहिरे, धर्मा सोनवणे, पंकज सोनवणे, चेतन मोरे, प्रवीण अहिरे, सुभाष पाटील, राकेश सोनवणे, बबन सोनवणे, अशोक सोनवणे, वसंत सोनवणे, श्रीपाद कायस्त, भारत कटके, दादू सोनवणे, भैया रौंदळ, राजेंद्र देवरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.(वार्ताहर)