गॉड पार्टीकलपेक्षाही मन सूक्ष्म स्वामी स्वरूपानंद : स्व. पोतनीस स्मृती व्याख्यानमाला
By Admin | Updated: November 14, 2014 01:02 IST2014-11-14T00:54:00+5:302014-11-14T01:02:16+5:30
गॉड पार्टीकलपेक्षाही मन सूक्ष्म स्वामी स्वरूपानंद : स्व. पोतनीस स्मृती व्याख्यानमाला

गॉड पार्टीकलपेक्षाही मन सूक्ष्म स्वामी स्वरूपानंद : स्व. पोतनीस स्मृती व्याख्यानमाला
नाशिक : मन हा एक विचार आहे, वृत्ती आहे. मन दिसत नसले तरीही आपण ते अनुभवत असतो. बिग बॅँगमध्ये शोधलेला गॉड पार्टीकल अर्थात ईश्वरी कणापेक्षाही मन हे सूक्ष्म आहे. या मनाला स्वीकार करायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन फुलगाव आश्रमाचे स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी स्व. दादासाहेब पोतनीस स्मृती व्याख्यानमालेत बोलताना केले. प. सा. नाट्यगृहात संस्कृतिवैभव आयोजित व्याख्यानमालेत ‘मी कोण आहे...?’ या विषयावर बोलताना स्वामी स्वरूपानंद यांनी सांगितले, मातीतून घट निर्माण झाला की घटाला स्वत:ची सत्ता नसते. मातीची सत्ता घटाला अस्तित्व देते. प्रत्येक रूपाला भिन्न करण्यासाठी नाव दिले जाते. शरीरालाही रूप आहे. व्यवहार सुकर व्हावा म्हणून शरीराचे नामकरण केले जाते. शरीराला ‘मी’ने अस्तित्व दिले आहे. ‘मी’ निरनिराळ्या कर्माच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. ‘मी’ हा शरीरात असूनही तो स्वतंत्र आहे, हे जर कळाले तर अनेक प्रश्न मार्गी लागतील. आज प्रत्येकाचा जीवनसंघर्ष सुरू आहे. काळा माणूस गोरा होण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे खरा माणूस कोण हे कळेनासे होते. आपल्या जीवनात काय आहे ते पाहायला शिकले पाहिजे. मनाचा स्वीकार केला पाहिजे. आपले जीवन आहे तसे स्वीकारले पाहिजे. मृत्यूसुद्धा आनंदाने स्वीकारा. मृत्यू भीती निर्माण करतो; परंतु त्यातून मुक्त व्हायचे असेल तर निर्भय झाले पाहिजे. शरीर मेले तरी मी राहणारच आहे. मी हा मर्त्य आहे, ही केवळ कल्पना आहे. शरीरात इंद्रियापेक्षाही मन हे सूक्ष्म आहे. आपणच आपल्या मनाचे निरीक्षण केले पाहिजे, असेही स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सांगितले.