मातोरी, भगूरला अवकाळी पाऊस
By Admin | Updated: March 2, 2016 23:48 IST2016-03-02T23:44:05+5:302016-03-02T23:48:00+5:30
मातोरी, भगूरला अवकाळी पाऊस

मातोरी, भगूरला अवकाळी पाऊस
भगूर : येथे सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे दिनचर्या विस्कळीत झाली आहे. पावसामुळे भगूरचा मंगळवारचा आठवडे बाजार विक्रेत्यांना गुंडाळून घ्यावा लागला. तर आजही तुरळक पावसाने हजेरी लावली.
भगूर परिसरामध्ये रविवारपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी सायंकाळी भगूर परिसरात तासभर मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने रहिवाशांची, दुकानदारांची व रस्त्यावरील विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ व धांदल उडाली होती. मंगळवारी भगूरला मोठ्या प्रमाणात आठवडे बाजार भरत असतो. नेहमीप्रमाणे दुपारनंतर बाजारात विक्रेते व ग्राहकांची मोठी गर्दी झालेली होती. सायंकाळी ढगाळ वातावरण पसरल्यानंतर काही वेळातच वाऱ्यासह मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने बाजारात धावपळ उडाली. विक्रेत्यांना मोठी कसरत करत विक्रीस आणलेले सामान गुंडाळून आसरा शोधण्याची पाळी आली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती मालाचे नुकसान झाले. (वार्ताहर)