कादवातर्फे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग
By Admin | Updated: January 9, 2016 23:59 IST2016-01-09T23:59:26+5:302016-01-09T23:59:49+5:30
कादवातर्फे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग

कादवातर्फे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग
दिंडोरी : नाशिक जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव कादवा सहकारी साखर कारखान्याने सन २०१४-१५ मध्ये गाळप केलेल्या उसाची प्रतिटन रु. २११७ प्रमाणे एफआरपीची पूर्तता केली असून, उर्वरित रुपये ६१ प्रमाणे रक्कम संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खाती वर्ग केल्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सांगितले.
मागील वर्षी उसाची एफआरपी रु. २११७ होती. गेल्या वर्षभरात साखरेचे भाव कमालीचे खाली आल्याने एफआरपीची रक्कम पूर्ण करणे कारखान्यास अत्यंत अडचणीचे झाले होते. तरीही कारखान्याने ऊस उत्पादकांना दिलेल्या आश्वासना नुसार टप्प्याटप्प्याने आर्थिक उपलब्धतेनुसार यापूर्वीच रु . २०५६ अदा केले होते. आता रु. ६१ प्रमाणे एकूण रु. २११७ रक्कम अदा झाली आहे. या वर्षीचा गळीत हंगाम चालू आहे. ६३ दिवसात कारखान्याने १,०१,४२९ मे. टन ऊस गाळप केला असून, १,०३,७५० क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. साखर उतारा ११.१४ टक्के आहे. हंगामात कारखान्याचे पुरेशा प्रमाणात ऊसतोडणी मजूर असून, कार्यक्षेत्रात पाणी कमी असल्याची जाणीव संचालक मंडळास आहे. त्यामुळे गेट केनचा ऊस कमी करून कार्यक्षेत्रातील ऊसतोडणीला प्राधान्य दिले आहे.
जास्तीत जास्त ऊसतोडणी मजूर कार्यक्षेत्रात वाढविण्यात आले आहे. कार्यक्षेत्रातून दररोज सुमारे १७५० मे. टन ऊस गाळपास येतो व गेटकेनचा सुमारे १५० मे. टनापर्यंत ऊसपुरवठा होतो. ऊसतोडणी कार्यक्र माचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार ऊसतोड सुरू आहे. सर्व सभासदांच्या उसाची वेळेवर तोडणी होईल. कारखान्याची गाळप क्षमता १२५० मे. टन असूनसुद्धा दैनंदिन १८०० ते १९०० मे. टनापर्यंत उसाचे गाळप होत आहे. त्यामुळे सभासदांनी कोणत्याही प्रकारे ऊसतोडणीस घाई करू नये व कारखान्यास सहकार्य करावे. शासनाने उसाचे दर निश्चित केले असून, त्यात दरवर्षी वाढ होत आहे. तरी सर्व सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले आहे. यावेळी व्हाइस चेअरमन उत्तम भालेराव, संचालक मंडळ, प्रभारी कार्यकारी संचालक उपस्थित होते. (वार्ताहर)