मोहडमल्ल महाराजांचा मोहाडीत उत्सव
By Admin | Updated: July 24, 2016 22:01 IST2016-07-24T21:54:04+5:302016-07-24T22:01:49+5:30
मोहडमल्ल महाराजांचा मोहाडीत उत्सव

मोहडमल्ल महाराजांचा मोहाडीत उत्सव
दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोहाडीचे ग्रामदैवत मोहडमल्ल महाराजांचा सार्वजनिक रोठाचा कार्यक्र म उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी आषाढ महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी रोठाचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. परंपरेनुसार गावातील धनगर समाजाकडे रोठाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रोठाच्या दिवशी पहाटेच गावातील उत्साही तरुण रामकुंडावर स्नान करून पायी कावडीत गंगाजल घेऊन आले. त्यानंतर मंत्रघोषात पंचामृत व जलाभिषेक करून ब्रह्मवृंदाने महापूजा केली. सजवलेल्या बैलगाडीतून व पारंपरिक पद्धतीने संबळ पिपाणीच्या तालावर मोहडमल्ल महाराज मूर्तीची वाजतगाजत संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. पाऊस चालू असतांनाही ग्रामस्थ व तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता. जयघोषाने सर्व गाव दणाणून गेले होते. माताभगिनींनी रांगोळी व पंचारतीने मोहडमल्ल महाराजांचे स्वागत केले. गावातील आबालवृद्धांनी पिपाणी व संबळवर ठेका धरला.
मिरवणूकवेळी लोक धान्य व रोख देणगी देतात. त्या धान्याचा लगेचच भरडा करून व देणगीचे गुळ तुपाचा नैवेद्य मोहडमल्ल महाराजांना
दाखवून सुखशांती व समृद्धी
लाभावी यासाठी प्रार्थना करतात. (वार्ताहर)