मनपा निवडणुकीच्या मतदानाचे होणार मॉकड्रिल
By Admin | Updated: July 8, 2016 00:29 IST2016-07-08T00:28:50+5:302016-07-08T00:29:38+5:30
आयोगाची सूचना : बूथसंख्या, मतदानकेंद्र वाढणार

मनपा निवडणुकीच्या मतदानाचे होणार मॉकड्रिल
नाशिक : मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभागरचना निश्चित करण्यात आल्याने त्यादृष्टीने मतदानाची तयारी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणूक शाखेला दिले आहेत. त्यानुसार, लवकरच निवडणुकीच्या मतदानाचे मॉकड्रिल (प्रात्यक्षिक)करत बूथसंख्या आणि मतदान केंद्रे निश्चित केली जाणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी व अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी दिली.
येत्या आठ महिन्यांवर महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली असून राज्य निवडणूक आयोगाने यंदा बहुसदस्यीय प्रभागरचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एका प्रभागात तीनपेक्षा अधिक आणि पाचपेक्षा कमी सदस्यसंख्या असणार आहे. प्रामुख्याने एका प्रभागात चार सदस्य निवडून द्यावे लागणार आहे. त्यामुळे मतदान यंत्रावर उमेदवारांची संख्या वाढणार असल्याने आणि प्रभागाची मतदारसंख्या वाढणार असल्याने राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला त्यादृष्टीने आतापासूनच तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. आगामी महापालिका निवडणूक ही सन २०११ च्या जनगणनेनुसार घेण्यात येणार असून १२२ सदस्यसंख्या राहण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे एका प्रभागाची मतदारसंख्या सुमारे ३५ ते ४० हजाराच्या आसपास असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेत मतदानाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी बूथ आणि मतदान केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे. पहिल्यांदाच चार सदस्यांचा प्रभाग होणार असल्याने प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी काही अडचणी येऊ नये आणि कोणत्याही त्रुटी राहू नये याकरिता महापालिकेला मतदानाचे मॉकड्रिल घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार, लवकरच मॉकड्रिल घेण्यात येणार असल्याची माहिती अनिल चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)