‘सिम्बॉयसिस’चा आगळा ‘मोबाइल टॉयलेट’ प्रकल्प
By Admin | Updated: September 15, 2015 22:21 IST2015-09-15T22:21:01+5:302015-09-15T22:21:48+5:30
हरित कुंभ : डोंगरे वसतिगृहावर भाविकांची सोय

‘सिम्बॉयसिस’चा आगळा ‘मोबाइल टॉयलेट’ प्रकल्प
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात अनेक सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. यातील एक आगळावेगळा प्रकल्प नाशिकमधील सिम्बॉयसिस महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी डोंगरे वसतिगृहावर राबविलेला मोबाइल टॉयलेटचा उपक्रम होय. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या स्वच्छतागृहातील टँकमध्ये सोडलेले जीवाणू हे मैल्याचे रूपांतर पाण्यात व बॉयोगॅसमध्ये करतात.
यासंबंधी पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रा. डॉ. वंदना सोनवणे यांनी सांगितले की, दुसऱ्या शाही पर्वणीच्या दिवशी डोंगरे वसतिगृहावर वाहनतळ असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी होती. यामुळे भाविकांच्या सोयीसाठी सिम्बॉयसिस कॉलेजच्या वतीने शुद्धी प्रोजेक्ट टीममार्फत मोबाइल टॉयलेट उभारून स्वच्छ भारत अभियान व हरितकुंभ चळवळ राबविण्यात आली. महाविद्यालयामार्फत घेण्यात आलेल्या कुंभथॉन स्पर्धेअंतर्गत प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी डीआरडीइच्या सहकार्याने ही स्वच्छतागृहे तयार केली आहेत. दोन भागात विभागलेली ही स्वच्छतागृहे ट्रॅक्टर किंवा अन्य वाहनांच्या मदतीने कोठेही घेऊन जाता येतात.
एका स्वच्छतागृहात दोन्ही बाजूने पाच-पाच स्वच्छतागृहे असून, बायो डिजिस्टर टँक आणि बायो डिजिस्ट टॉयलेट अशा दोन भागात असलेल्या या प्रसाधनगृहात खालील बाजूच्या टाकीत जमा झालेल्या मैल्याचे टँकमधील जीवाणू पाण्यात व बायोगॅसमध्ये रूपांतर करतात. सदर प्रसाधनगृहे उभारण्यासाठी अनेक खासगी कंपन्यांनी सहकार्य केले. हरित कुंभ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाला जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशावह, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे तसेच मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी आदिंनी भेट देऊन सूचना केल्या, असेही सोनवणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)