कारागृहात मोबाइलचा सिलसिला सुरुच
By Admin | Updated: December 25, 2016 01:59 IST2016-12-25T01:57:34+5:302016-12-25T01:59:13+5:30
पुन्हा आढळले पाच मोबाइल : गुन्हा दाखल, कारागृहाच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह
कारागृहात मोबाइलचा सिलसिला सुरुच
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडे व बेवारसरीत्या वर्षभरात सापडलेल्या मोबाइलच्या संख्येने ‘अर्धशतक’ गाठले आहे. कारागृहात शुक्रवारी पुन्हा पाच बेवारस मोबाइल आढळून आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोडला मध्यवर्ती कारागृहातील बिघडलेली शिस्त, सुरक्षितता यामुळे कारागृह प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. कारागृहात होणारा मोबाइलचा सर्रास वापर हे काही विशेष राहिलेले नाही. कारागृहातील अनागोंदी व गैरप्रकारच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस महासंचालक तथा कारागृह निरीक्षक भूषणकुमार उपाध्याय यांनी दोन दिवसांपूर्वीच वरिष्ठ तुरुंग अधिकारी कैलास भवर, गणेश मानकर, सुनीलकुमार कुंवर यांना चौकशीअंती निलंबित केले. यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून, गेल्या महिन्याभरात कारागृहात जवळपास ४० मोबाइल सापडले आहेत.
कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी मंडल क्रमांक ७ सर्कल ६ची झडती घेतली असता शौचालयाच्या भांड्यात व खोली क्रमांक १४६च्या पाठीमागील खिडकीच्या फटीत ५ मोबाइल बेवारसरीत्या आढळून आले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृहातील अनागोंदी, गैरप्रकार, बिघडलेली शिस्त व सुरक्षितेच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वीच कारागृहातील ११ कैद्यांना इतर कारागृहात हलविण्यात आले. तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामुळे कारागृहातील अधिकारी - कर्मचारी कुठलीही गोष्ट अंगावर घेण्यास तयार नसल्याने कारागृहात सापडत असलेले मोबाइल कायदेशीररीत्या कागदावर येत असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)