आरटीओ कॉर्नर भाजीबाजारात मोबाइल चोरट्यांचा वावर
By Admin | Updated: November 27, 2014 23:00 IST2014-11-27T23:00:07+5:302014-11-27T23:00:16+5:30
पोलिसांचे दुर्लक्ष : भाजीव्रिकेते, ग्राहक त्रस्त

आरटीओ कॉर्नर भाजीबाजारात मोबाइल चोरट्यांचा वावर
पंचवटी : दिंडोरीरोडवरील आरटीओ कॉर्नरला दररोज सायंकाळच्या सुमारास भरणाऱ्या भाजीबाजारात मोबाइल चोरणाऱ्या टोळक्याने धुमाकूळ घातला आहे. महिनाभरापासून भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे किंमती मोबाइल चोरीस जात असल्याने आरटीओ कॉर्नरच्या भाजीबाजाराला चोर बाजाराचे स्वरूप प्राप्त झाल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे.
विशेष म्हणजे, दिंडोरीरोडवरील मेरी पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हा भाजीबाजार भरत असून, दैनंदिन मोबाइल चोरीच्या घटना घडल्यानंतरही पंचवटी पोलिसांचे विशेषत: वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना हजारो रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वारंवार मोबाइल चोरीच्या घटना घडत असल्याने या भाजीबाजारात भाजीविक्रीसाठी येणारे विक्रेते व भाजीपाला खरेदीसाठी येणारे ग्राहक त्रस्त झाले आहेत. पूर्वी गंगाघाटावरील आठवडे बाजार, महालक्ष्मी सिनेमागृहाबाहेर भरणारा भाजीबाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती व आता मोबाइल चोरट्यांनी आरटीओ कॉर्नरचा भाजीबाजार लक्ष्य केल्याने पंचवटी पोलिसांच्या कामकाजावर संशय व्यक्त केला जात आहे.
दुचाकीचोरी, चोरी, रोकड लुटणे, घरफोडी यांसारख्या घटना नित्याच्याच झालेल्या असताना, आता मोबाइल चोरीच्या घटनांत वाढ झाल्याची तक्रार नागरिकांनी केल्याने मोबाइल चोरी रोखण्यासाठी पंचवटी पोलीस पुढाकार घेतील का, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे. (वार्ताहर)