पालिका प्रशासनापुढे मनसेचे लोटांगण
By Admin | Updated: December 8, 2015 00:19 IST2015-12-08T00:18:06+5:302015-12-08T00:19:24+5:30
घंटागाडीचा ठेका दहा वर्षांसाठी : भूमिकेत बदल, विरोधकांसह सत्ताधारी मित्रपक्षांचाही कडाडून विरोध

पालिका प्रशासनापुढे मनसेचे लोटांगण
नाशिक : आठ महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या महासभेत घंटागाडीचा ठेका तीन वर्षांसाठी विभागनिहाय देण्याचा सत्ताधारी मनसेने घेतलेला निर्णय सोमवारी झालेल्या महासभेत फिरविला आणि प्रशासनापुढे सपशेल लोटांगण घालत दहा वर्षांसाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा ठेका देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. दहा वर्षे ठेका देण्यास सत्ताधारी घटक पक्षांनी केलेला कडाडून विरोध आणि सेना-भाजपाने सदर प्रस्तावावर मतदान घेण्याची मागणी केल्यानंतर अडचणीत सापडलेल्या महापौरांनी गोंधळातच प्रस्तावाला मान्यता दिली. महापौरांच्या या निर्णयानंतर सेना-भाजपाच्या सदस्यांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.
६ एप्रिल २०१५ रोजी झालेल्या महासभेत तीन तास चर्चा होऊन महापौरांनी घंटागाडीचा ठेका तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीकरिता देऊ नये आणि विभागनिहाय ठेका देण्याचा निर्णय जाहीर केला होता.