मनसे शिक्षक सेनेने बॅँकेला ठोकले टाळे
By Admin | Updated: April 27, 2017 01:51 IST2017-04-27T01:51:08+5:302017-04-27T01:51:25+5:30
चार महिन्यांपासून वेतनाची पूर्ण रक्कम अदा केली जात नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या क ार्यकर्त्यांनी टाळे ठोको आंदोलन केले.

मनसे शिक्षक सेनेने बॅँकेला ठोकले टाळे
नाशिक : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खातेदारांना सुमारे चार महिन्यांपासून वेतनाची पूर्ण रक्कम अदा केली जात नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या पदाधिकारी व क ार्यकर्त्यांनी टाळे ठोको आंदोलन केले.
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या पंचवटी शाखेच्या द्वारावर मनसे शिक्षकांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धडक देऊन कुलूपबंद आंदोलन करत घोषणाबाजी केली. चार महिन्यांपासून हजार ते दीड हजारांपेक्षा अधिक रक्कम शिक्षकांना दिली जात नसल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. खातेदार शिक्षकांचे पैशांअभावी हाल होत असून दैनंदिन व्यवहार कोलमडून पडले आहे. शिक्षकांना बॅँकेच्या खेट्या घालूनही रक्कम दिली जात नसून हक्काचे पैसे मिळत नसल्याने शिक्षकांवर भीक मागण्याची वेळ प्रशासनाने आणल्याचा आरोप यावेळी संघटनेकडून करण्यात आला. बॅँकेचे धनादेशही बाउन्स केले जात असल्याचे निवदेनात म्हटले आहे. आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने आठवड्याभरापूर्वी देण्यात आला होता; मात्र शाखेमधून कुठलेही सुरळीत कामकाज सुरू न झाल्यामुळे अखेर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलूप ठोकत निषेध व्यक्त केला. यावेळी महानगराध्यक्ष वासुदेव बधान, जिल्हाध्यक्ष बी. एम. निकम, जिल्हा सरचिटणीस रघुनाथ हळदे, एकनाथ पाटील यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते