मनसेतील फूटप्रकरणी अहवाल ‘राज’दरबारी

By Admin | Updated: April 11, 2015 00:07 IST2015-04-11T00:07:21+5:302015-04-11T00:07:47+5:30

पश्चिम प्रभाग सभापती प्रकरण : माजी महापौरांच्या कृतीने पक्षात तर्कवितर्क

MNS split report 'Raj' Darbari | मनसेतील फूटप्रकरणी अहवाल ‘राज’दरबारी

मनसेतील फूटप्रकरणी अहवाल ‘राज’दरबारी

नाशिक : महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून मतदान करणारे माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, सुनीता मोटकरी आणि उमेदवारी करणाऱ्या माधुरी जाधव या मनसेच्या तिघा सदस्यांसंबंधीचा अहवाल पालिकेतील मनसेचे गटनेते अनिल मटाले यांनी शहर संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांच्याकडे पाठविला आहे. दरम्यान, शनिवारी (दि.११) राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होत असून, त्यामध्ये नाशकात पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या माजी महापौरांसह तिघा सदस्यांसंबंधी ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
गुरुवारी झालेल्या पश्चिम प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने आघाडीधर्म म्हणून कॉँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याचा व्हीप आपल्या सदस्यांना बजाविला होता; परंतु ऐनवेळी राजकीय घडामोडी होऊन मनसेच्या बंडखोर उमेदवार माधुरी जाधव यांनी उमेदवारी करत माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ व सुनीता मोटकरी यांच्यासह सेना-भाजपा उमेदवारांच्या मदतीने सभापतिपद प्राप्त केले होते. निवडणुकीत चक्क माजी महापौर यतिन वाघ यांनी पक्षविरोधी भूमिका घेत सर्वांनाच अनपेक्षितपणे धक्का दिला.
गुरुवारी घडलेल्या या राजकीय घडामोडीनंतर मनसेचे गटनेते अनिल मटाले यांनी संपूर्ण घटनेचा अहवाल शहर संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांच्याकडे पाठविला आहे. याबाबत मटाले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, माजी महापौरांसह तिघा नगरसेवकांनी केलेली पक्षविरोधी कृती अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. माजी महापौरांना तर पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महापालिकेचे सर्वोच्च पद बहाल केले.
मनसेचा पहिला महापौर म्हणून त्यांचा नावलौकिक झाला; परंतु त्यांनी घेतलेली भूमिका अशोभनीय अशीच आहे. महापौरपद भूषविलेल्या माणसाला पक्षाचा व्हीप माहित असू नये, याबाबत मटाले यांनी आश्चर्य व्यक्त केले. वाघ यांना पक्षादेशाची माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मनसेतील फुटीप्रकरणी पालिका वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले असून, मनसेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही पक्षविरोधी कृतीबद्दल संताप व्यक्त केला आहे. वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सेना-भाजपला केलेली मदत हा मनसेच्या रणनीतीचा प्रकार आहे की काय, याबाबतही पालिकेच्या वर्तुळात चर्चा सुरू असलेली आढळून आली. (प्रतिनिधी)

Web Title: MNS split report 'Raj' Darbari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.