मनसेत लवकरच मोठी फूट?

By Admin | Updated: October 23, 2014 00:21 IST2014-10-23T00:20:57+5:302014-10-23T00:21:25+5:30

भाजपा, सेनेच्या संपर्कात : नाराजांमध्ये पक्षाचे नेतेही

MNS soon bigger foot? | मनसेत लवकरच मोठी फूट?

मनसेत लवकरच मोठी फूट?

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कौल बघितल्यानंतर भाजपाकडे धावाधाव करणाऱ्या नेत्यांच्या पाठोपाठ आता पालिकेतील नगरसेवकदेखील अशाच प्रकारे सत्तेच्या चुंबकाकडे आकृष्ट होत आहेत. मनसे सत्तेत असताना प्रभागात कामे होत नाहीत असा आक्षेप असलेल्या नगरसेवकांना विधानसभा निवडणुकीतील पराभवाने अधिकच धक्का बसला आहे. त्यामुळे काही नगरसेवक भाजपा आणि शिवसेनेच्या मार्गावर असल्याचे वृत्त आहे. इतकेच नव्हे तर पक्षाचे काही नेतेही त्याच मार्गावर असल्याचे सांगितले जात असून दिवाळीनंतर घडामोडी वेगवान होण्याची शक्यता आहे.
नाशिक म्हणजे मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता. पक्षाचे शहरात तीन आमदार आणि चाळीस नगरसेवकांबरोबरच महापौररपद मनसेकडे होते. परंतु पालिकेतील कार्याचा आलेख फार वर गेला नाही. त्यामुळे मनसेच्या सत्ताकाळात कामे होत नाही या एकमेव टीकेला पक्षाला सामोरे जावे लागले. तीच आता कार्यकर्त्यांची खासगीतील भावनाही आहे. त्यातून ही अवस्था झाली आहे. महापालिकेतील भाजपाच्या एका नेत्याने मनसेचे आठ नगरसेवक पक्षनेत्यांशी संधान साधून असल्याचा दावा केला आहे. महापालिकेत मनसेचे ४० नगरसेवक होते. त्यापैकी हेमंत गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश करून नंतर लोकसभा निवडणूक लढविली. त्यानंतर नीलेश शेलार आणि शोभना शिंदे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळीच शिवसेना गाठली.
खरे तर मनसेत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अनेक नगरसेवक अस्वस्थ आहेत. त्यामुळेच महापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळीच मोठी फाटाफूट होणार असल्याची चर्चा होती व ते हेरूनच शिवसेनेने मनसेचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केली
होती. त्यावेळी दक्षता घेतल्याने फूट टळली.
विधानसभा निवडणुकीत मनसेचे राज्यस्तरावर पानिपत झाले. त्यास या पक्षातील नाराज नगरसेवकांचा हातभार लागल्याचे सांगितले जात आहे. आता भाजपा आणि सेनेचे प्राबल्य वाढलेले दिसत असल्याने अनेक नगरसेवक या पक्षांकडे जाण्याच्या तयारीत आहेत. त्यातूनच मनसेचे आठ नगरसेवक आता भाजपाच्या संपर्कात असून, लवकरच मोठा गट बाहेर पडण्याची शक्यता भाजपाच्या एका पदाधिकारी नगरसेवकाने व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर पराभवाच्या धक्यामुळे एक आमदारही अन्य पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असून, दिवाळीनंतरच याबाबत सारे खुलासे होणे शक्य आहे. (प्रतिनिधी)

Web Title: MNS soon bigger foot?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.