मनसेच्या कार्यकारिणीला लवकरच लागणार मुहूर्त
By Admin | Updated: January 6, 2016 00:22 IST2016-01-06T00:13:53+5:302016-01-06T00:22:32+5:30
प्रथम शहर नंतर जिल्हा : निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना नारळ

मनसेच्या कार्यकारिणीला लवकरच लागणार मुहूर्त
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा सत्तेची कमान सांभाळण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर देण्यास प्रारंभ केला असून, गेल्या दोन दिवसांपासून संपर्क नेत्यांनी विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका लावला आहे. दरम्यान, येत्या तीन-चार दिवसांत पक्षाची शहर कार्यकारिणी घोषित करण्यात येणार असून, त्यानंतर जिल्हा कार्यकारिणीचा विचार केला जाणार असल्याची माहिती संपर्क नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिली.
मनसेच्या राजगड या मध्यवर्ती कार्यालयात गेल्या दोन दिवसांपासून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थी सेना, रोजगार स्वयंरोजगार सेना, शारीरिक प्रशिक्षण विभाग, वीज कामगार सेना, लॉटरी सेना, माथाडी कामगार, चित्रपट सेना, हॉकर्स सेना यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पक्षाच्या आगामी उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. पक्षाचे संपर्क प्रमुख अविनाश अभ्यंकर, राज्य सचिव प्रमोद पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.