महापौरांच्या प्रभागात मनसेला धोबीपछाड लोकसभा निवडणूक : सेना उमेदवाराचे वर्चस्व
By Admin | Updated: May 21, 2014 23:58 IST2014-05-21T23:55:11+5:302014-05-21T23:58:33+5:30
नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात चारीमुंड्या चीत झालेल्या मनसेची वाताहत महापौर ॲड. यतिन वाघ यांना आपल्या प्रभागातही रोखता आलेली नाही. महापौरांच्या प्रभागात मतदारांनी मनसेला धोबीपछाड देत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या झोळीत मतांचे भरभरून दान टाकले.

महापौरांच्या प्रभागात मनसेला धोबीपछाड लोकसभा निवडणूक : सेना उमेदवाराचे वर्चस्व
नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात चारीमुंड्या चीत झालेल्या मनसेची वाताहत महापौर ॲड. यतिन वाघ यांना आपल्या प्रभागातही रोखता आलेली नाही. महापौरांच्या प्रभागात मतदारांनी मनसेला धोबीपछाड देत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या झोळीत मतांचे भरभरून दान टाकले.
सन २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेकडून उमेदवारी करताना हेमंत गोडसे यांचा अवघ्या २२ हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. यंदाही मनसेने नाशिक मतदारसंघाची जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यानुसार निवडणुकीच्या एक वर्ष अगोदरच राज ठाकरे यांनी डॉ. प्रदीप पवार यांना उमेदवारी करण्याचे निर्देश देत नवा उच्चविभूषित चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न दाखविला होता. पवार यांनीही जोमाने कामाला लागत वातावरण निर्मिती केली होती. मतदानाच्या अगोदर काही दिवसांपर्यंत पवार चर्चेत होते. परंतु मतदानाच्या दिवशी खरा सामना शिवसेनेचे हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यातच पाहावयास मिळाला. लोकसभा निवडणुकीत मनसे तिसर्या स्थानावर फेकली गेली, शिवाय उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढवली. मनसेच्या उमेदवाराला केवळ ६३,०५० मतांवर समाधान मानावे लागले. सहाही विधानसभा मतदारसंघात मनसेला पिछाडीला सामोरे जावे लागले. सर्वत्र मनसेने मार खाल्ला असताना महापौरांच्या प्रभागातही मनसेची बिकट अवस्था बघायला मिळाली. आता मतदानकेंद्रनिहाय जाहीर होत असलेल्या आकडेवारीनुसार महापौरांच्या प्रभागातील पेठे विद्यालयातील केंद्रात हेमंत गोडसे यांना २०९५, छगन भुजबळ यांना ९७० मते मिळाली. मात्र, मनसेचे डॉ. प्रदीप पवार यांना अवघी ३६३ मते मिळाली. गोरेराम लेनमधील केंद्रातही गोडसे यांना १००६, भुजबळांना २६६ तर मनसेचे प्रदीप पवार यांना अवघी ६७ मते पदरात पाडून घेता आली. विवेकानंद विद्यालयातील केंद्रातही गोडसे यांना ८६१, भुजबळ यांना ३६७ तर पवार यांना १४६ मते मिळाली. मनसेच्या महापौरांच्या प्रभागातच मनसेची झालेली वाताहत ॲड. यतिन वाघ यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
महापौर विरोधकांची पूर्वतयारी
गेल्या दोन टर्मपासून रविवार पेठ परिसरातून निवडून गेलेल्या ॲड. यतिन वाघ यांना महापालिकेची पुढची निवडणूक अवघड असल्याची आता चर्चा होऊ लागली आहे. मनसेच्या हाती महापालिकेची सत्ता देऊनही शहराचा कायापालट न झाल्याची भावना मतदारांमध्ये उफाळून आली असून, त्याचा राग त्यांनी मतपेटीतून व्यक्त केला असल्याची प्रतिक्रिया मनसेविरोधकांकडून व्यक्त होत आहे. महापौरांना शह देण्यासाठी आतापासूनच काही इच्छुकांनी पूर्वतयारीस प्रारंभ केला आहे.