निकालाआधीच मनसेची साफसफाई शहराध्यक्षपदी ढिकले: जिल्हाध्यक्षांसह अनेक खांदेपालट होणार
By Admin | Updated: May 16, 2014 00:19 IST2014-05-16T00:14:07+5:302014-05-16T00:19:25+5:30
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच नाशिकमध्ये येऊन ऑडिट करणार्या राज ठाकरे यांनी पक्षात साफसफाई सुरू केली असून, पक्षाच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक राहुल ढिकले यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच जिल्हाप्रमुख, पालिकेतील सत्ताधिकारी पदाधिकार्यांमध्येही बदल होणार आहेत.

निकालाआधीच मनसेची साफसफाई शहराध्यक्षपदी ढिकले: जिल्हाध्यक्षांसह अनेक खांदेपालट होणार
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच नाशिकमध्ये येऊन ऑडिट करणार्या राज ठाकरे यांनी पक्षात साफसफाई सुरू केली असून, पक्षाच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक राहुल ढिकले यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच जिल्हाप्रमुख, पालिकेतील सत्ताधिकारी पदाधिकार्यांमध्येही बदल होणार आहेत.
राज ठाकरे यांच्या दृष्टीने नाशिक हा बालेकिल्ला आहे. तीन आमदारांबरोबरच चाळीस नगरसेवक निवडून आल्याने मनसे पालिकेत सत्तेवर आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही राज ठाकरे यांना नाशिककडून मोठी अपेक्षा असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, या निवडणुकीत मनसेच्या अनेक चुका झाल्याच्या तसेच फितुरीच्या तक्रारी राज यांच्यापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच गेल्या शुक्रवारी अचानक नाशिकमध्ये येऊन राज ठाकरे यांनी निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेतला. प्रत्येक नगरसेवकाशी एकेक करून चर्चा केली. त्यानंतर शुक्रवारी लोकसभा निवडणुकीचा निर्णय लागण्याच्या आतच राज ठाकरे यांनी सफाई मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसारच अवघ्या चार महिन्यांपूर्वी नियुक्त केलेल्या समीर शेटे यांना हटवून त्यांच्या जागी पंचवटीतील मनसे नगरसेवक ॲड. राहुल ढिकले यांची नियुक्ती केली आहे. समीर शेटे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती यापूर्वीच केली होती असे समजते. याच कारणामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचा सहभाग मर्यादित होता. त्यामुळे त्यांना हटवून राहुल ढिकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज मुंबई येथे ढिकले यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार वसंत गिते उपस्थित होते.
लवकरच जिल्हाध्यक्ष आणि पालिकेतील गटनेते यांच्यात बदल होण्याचीही शक्यता आहे. जिल्हाप्रमुख पदासाठी अशोक मुर्तडक आणि डॉ. प्रदीप पवार यांच्या नावांची चर्चा आहे. याशिवाय पालिकेतील गटनेते अशोक सातभाई यांनी आपली वर्षभराची मुदत संपल्याचे अगोदरच पक्षाला कळवले आहे. त्यामुळे गटनेता आणि सभागृह नेत्यांच्या बदलाचीही शक्यता वर्तवली जात आहे.
जोड आहे...