मनपाच्या पाणी आरक्षणात १०० दलघफू वाढ शक्य

By Admin | Updated: July 7, 2016 00:31 IST2016-07-06T23:55:18+5:302016-07-07T00:31:37+5:30

आठ दिवसांची तूट : १७ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा गंगापूर धरणात शिल्लक

MMP's water reservation can increase 100 Dalfu | मनपाच्या पाणी आरक्षणात १०० दलघफू वाढ शक्य

मनपाच्या पाणी आरक्षणात १०० दलघफू वाढ शक्य

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात महापालिकेच्या एकूण ३००० दलघफू आरक्षित पाणीसाठ्यापैकी केवळ १७४ दलघफू म्हणजे १७ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असून ३१ जुलैपर्यंत आठ दिवसांची तूट भरून काढण्यासाठी मनपाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अतिरिक्त सुमारे १०० दलघफू पाण्याची मागणी नोंदवावी लागणार आहे.
जायकवाडीला पाणी सोडण्याच्या वादानंतर शासनाने सन २०१५-१६ या वर्षासाठी महापालिकेला गंगापूर धरणातील २७०० दलघफू, तर दारणातील ५०० दलघफू पाणी आरक्षित निश्चित केले होते. त्यानंतर पुन्हा त्यात बदल करत शासनाने गंगापूर धरणातील आणखी ३०० दलघफू पाणी वाढवून दिल्याने आरक्षित पाणी ३००० दलघफूवर जाऊन पोहोचले. त्यापैकी गंगापूर धरणातून महापालिकेने आतापर्यंत २८२५ दलघफू पाण्याची उचल केली असून दारणातून केवळ १६६ दलघफू पाण्याचा उपसा झालेला आहे. त्यामुळे गंगापूरमध्ये दि. ६ जुलैअखेर १७४ दलघफू आरक्षित पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिका प्रतिदिन १० दलघफू पाणी उचलत आहे. त्यामुळे आरक्षित पाणीसाठा हा केवळ १७ दिवस पुरणार आहे. साधारणपणे २३ जुलैच्या आसपास गंगापूरमधील महापालिकेचे पाण्याचे आरक्षण संपुष्टात येणार आहे. ३१ जुलैपर्यंत पाणी पुरविण्यासाठी म्हणजे शिल्लक आठ दिवसांसाठी महापालिकेला सुमारे ८० ते १०० दलघफू पाण्याची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे वाढीव पाण्यासाठी महापालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी नोंदवावी लागणार आहे. ३१ जुलैनंतर नव्याने आरक्षित पाण्याची मागणी नोंदविली जाणार आहे. त्यामुळे आठ दिवसांच्या पाण्यासाठी महापालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याचना करावी लागणार असून, गंगापूर धरणातील वाढत चाललेला पाणीसाठा पाहता शासनाला सदर मागणी पूर्ण करणे भाग पडणार आहे. दारणा धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत असली तरी चेहेडी बंधाऱ्यात पाणी सोडल्याशिवाय मनपाला पाण्याचा उपसा करता येणार नाही. त्यामुळे गंगापूरमधूनच वाढीव पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: MMP's water reservation can increase 100 Dalfu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.