मनपाकडे साडेबारा कोटी थकबाकी
By Admin | Updated: September 26, 2016 00:34 IST2016-09-26T00:33:31+5:302016-09-26T00:34:12+5:30
मालेगाव : सेवानिवृत्त दोनशे शिक्षकांची तक्रार

मनपाकडे साडेबारा कोटी थकबाकी
मालेगाव : येथील मनपाकडे दोनशे शिक्षकांची एकूण साडेबारा कोटी रुपये थकबाकी झाली असून, २०११ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना त्यांच्या हक्काची उपदान व पेन्शन विक्रीचे एकूण तीन कोटी रुपये, सहाव्या वेतन आयोगाचे फरकाचे हप्तेपोटी तीन कोटी व अन्य बाबींची एकूण साडेबारा कोटी रक्कम अद्यापही देण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र शासनाने त्यांच्याकडील पन्नास टक्के रक्कम दिली. सेवानिवृत्तांना ती देण्यात आलेली आहे. परंतु मनपाकडील पन्नास टक्के हिश्याची एकूण थकबाकी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांच्या कुटुंबांची कुचंबना होत आहे. सुमारे ५०-५२ सेवानिवृत्त शिक्षक मयत झाले. गेल्या सहा-सात वर्षांपासून सेवानिवृत्त शिक्षक व तालुका पेन्शनर संघटना याचा पाठपुरावा करत आहे. येणारे प्रत्येक प्रशासन अधिकारी व आयुक्त यांना निवेदन देण्यात आली. शिष्टमंडळासह भेटी झाल्या; पण महापालिकेने सदर बिले देण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाही. शिष्टमंडळात कुरेशी गुलाम हैदर, सलाउद्दीन यासीन, अल्ताफ अहमद, जगन्नाथ जयराम, मोतीराम पवार, सईद अन्सारी, संतोष खंगरे, शंकरराव सूर्यवंशी, छगन पाटील, रावसाहेब आहेर, निसार अहमद, हारुण शाबान, शंकरराव सूर्यवंशी, लुकमान रुस्तुम, जगन्नाथ जाधव, पेन्शनर संघटनेचे बी. के. नागपुरे, अहिरराव, पी. बी. कुलकर्णी, पी. पी. पगार उपस्थित होते. महापालिकेस देयकासंबंधी दहा दिवसांचा अवधी देण्यात आला असून त्यानंतर भुसे आयुक्तांसमवेत बैठक घेतील. (प्रतिनिधी)
ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना संघटनेचे प्रतिनिधी व शंभर सेवानिवृत्त शिक्षकांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत निवेदन दिले. आयुक्त जगताप यांच्या समवेत बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याची विनंती केली. यावर भुसे यांनी आयुक्त यांना बैठक घेण्याची सूचना केली.