आमदार सीमा हिरे यांना घरचा अहेर
By Admin | Updated: February 24, 2017 01:40 IST2017-02-24T01:40:14+5:302017-02-24T01:40:27+5:30
पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

आमदार सीमा हिरे यांना घरचा अहेर
नाशिक : प्रभाग क्रमांक आठ भाजपाचा बालेकिल्ला असतानाही आमदार सीमा हिरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांशी हातमिळवणी करून पक्षविरोधी कारवाया केल्याची तक्रार या प्रभागातील भाजपाचे
पराभूत उमेदवार व भाजप युवा मोर्चाचे चिटणीस अमोल दिनकर पाटील यांनी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे.
या पत्रात पाटील यांनी म्हटले आहे की, पक्षाच्या उमेदवारांनी निवडणुकीपूर्वी तीन महिने प्रभाग पिंजून काढला होता. प्रचाराच्या वेळी आम्ही वारंवार पक्षाच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या घरी जाऊन विनवण्या केल्या व प्रचारात सहभागी होण्याची विनंती केली, परंतु त्या सहभागी झाल्या नाहीत. प्रभाग आठ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. या प्रभागातच आमदार हिरे यांचे निवासस्थान असून, याच भागातून त्यांनी नाशिक मनपासाठी प्रतिनिधित्व केलेले आहे. या ठिकाणी आपले प्राबल्य असल्याने फक्त राजकीय आकसापोटी आमदार हिरे यांनी उघडउघड विरोधक शिवसेनेच्या उमेदवारांना मदत केली, तसेच त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमबाजी करून शिवसेना उमेदवारांना मदत करण्यास प्रवृत्त केले.
या प्रभागात माझा पराभव हा माझा नव्हे आणि विरोधक शिवसेना उमेदवाराचा विजय नव्हे तर आमदार हिरे यांच्या पक्षविरोधी काम केल्याचा हा विजय आहे. दरम्यान, पाटील यांच्या या पत्राने भाजपाला घरचा अहेर मिळाला असून, एकीकडे पक्षाने महापालिकेची सत्ता काबीज केलेली असताना दुसरीकडे पक्षाच्या पराभूतांकडूनच अशा प्रकारचे आरोप झाल्याने पक्षात चलबिचल झाली आहे. (प्रतिनिधी)