मोबाइल कंपन्यांना मनपाचा दणका
By Admin | Updated: March 21, 2017 00:50 IST2017-03-21T00:50:44+5:302017-03-21T00:50:59+5:30
टॉवर्स सील : थकबाकी न भरल्यास घरमालकांकडून वसुली

मोबाइल कंपन्यांना मनपाचा दणका
नाशिक : महापालिकेने मिळकत कर थकविणाऱ्या विविध मोबाइल कंपन्यांचे सुमारे २७ टॉवर्स सील केले आहेत. त्यामुळे संबंधित कंपन्यांमार्फत देण्यात येणारी इंटरनेट व मोबाइल सेवा विस्कळीत झाली आहे. महापालिकेच्या कारवाईनंतर काही कंपन्यांनी थकबाकीचा भरणा केला आहे मात्र, ज्या कंपन्या थकबाकी भरणार नाहीत त्यांच्या थकबाकीची रक्कम संबंधित घरमालकांकडून वसूल केली जाणार असल्याचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेने मिळकत कराच्या थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू केलेली आहे. त्यात मोबाइल कंपन्यांनी ठिकठिकाणी उभारलेल्या टॉवर्सचीही सुमारे ६ कोटी रुपये थकबाकी आहे. शहरात सुमारे २०० टॉवर्स आहेत. त्यात महापालिकेने आतापर्यंत २७ मोबाइल टॉवर्सवर जप्तीची कारवाई करत सील ठोकले. त्यात जीटीएल, एअरसेल व एटीसी कंपन्यांचा समावेश होता.
यापूर्वी महापालिकेने बजावलेल्या नोटीसांनुसार आयडिया कंपनीने २४ लाख रुपये तर इंडस कंपनीने २४ लाख ५० हजार रुपयांची थकबाकी भरली आहे. तसेच एटीसी कंपनीने येत्या २३ मार्चपर्यंत थकबाकी भरण्याची लेखी हमी महापालिकेला दिली आहे. शहरात एटीसी कंपनीचे ४२ मोबाइल टॉवर्स असून, त्यातील १५ टॉवर्स महापालिकेने सील केले होते. याशिवाय, इंडस, रिलायन्स व रिलायन्स जीओ या कंपन्यांनीही २२ मार्चपर्यंत थकबाकी भरण्याची लेखी हमी दिली आहे.
सदर कंपन्यांनी मुदतीत थकबाकी न भरल्यास त्यांचेही टॉवर्स सील केले जाणार असल्याचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेने मोबाइल टॉवर्स सील करण्याची कारवाई केल्याने अनेक भागात मोबाइल व इंटरनेट सेवा विस्कळीत झाली असून, त्याचा सर्वाधिक फटका नाशिकरोड भागात बसल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)