भारत विकासात चीनच्या पुढे, हा गैरसमज
By Admin | Updated: April 11, 2015 00:30 IST2015-04-11T00:20:00+5:302015-04-11T00:30:44+5:30
नरेंद्र जाधव : क. का. वाघ स्मृती व्याख्यानात केले प्रतिपादन

भारत विकासात चीनच्या पुढे, हा गैरसमज
नाशिक : भारताने आर्थिक विकासात चीनला मागे टाकल्याची वृत्ते मूर्खपणाची असून, चीनचे दरडोई उत्पन्न भारताच्या पाचपट आहे. आपण या वर्षी केवळ चीनएवढा विकासदर गाठला असून, चीनला मागे टाकण्यासाठी कित्येक वर्ष लागणार असल्याचे वास्तव ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी मांडले.
कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षणसंस्थेच्या वतीने कर्मवीर वाघ स्मृती व्याख्यानमालेचे बारावे पुष्प शंकराचार्य संकुलात गुंफण्यात आले. पुणे विद्यापीठ उपविभागीय केंद्राचे समन्वयक प्रा. रावसाहेब शिंदे अध्यक्षस्थानी होते. डॉ. जाधव यांनी ‘भारताच्या आर्थिक धोरणाचे प्रतिबिंब : सन २०२० पर्यंत’ या विषयावर विवेचन केले.
भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल, बदल व आव्हाने अशा तीन टप्प्यांत मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, सन १९४७ पर्यंत भारताचा विकासदर शून्य टक्के होता. १९५१ पासून भारताने नियोजनबद्ध विकासाला सुरुवात केली.
१९९१ पर्यंतच्या चाळीस वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेची पायाभरणी झाली; मात्र १९७० ते ८० या काळात देशात परमीट राज बोकाळले. त्यामुळे उद्योगांच्या विकासाला खीळ बसली. परकीय गंगाजळी आटून देश प्रचंड आर्थिक संकटात सापडला. १९९१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांनी परमीट राज बंद करून मुक्त अर्थव्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे साडेतीन टक्क्यांवर अडून बसलेला देशाचा विकासदर ९ टक्क्यांवर पोहोचला. २००१ मध्ये भारत व चीन हे दोन देश प्रथमच जगाच्या अर्थव्यवस्थेवर उमटले; मात्र भारताने चीनवर मात केली, असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश कडवे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पी. एस. भंडारी यांनी परिचय करून दिला. वाघ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जे. जी. सुलक्षणे व एन. एस. रंधवे यांनी सूत्रसंचालन केले.
वाय. डी. जाधव यांनी आभार
मानले. (प्रतिनिधी)