सफाई कामगारांची दिशाभूल करून चित्रीकरण
By Admin | Updated: August 1, 2015 00:35 IST2015-08-01T00:34:51+5:302015-08-01T00:35:03+5:30
श्रमिक संघाचा मोर्चा : किमान वेतन मिळत असल्याचे घेतले वदवून

सफाई कामगारांची दिशाभूल करून चित्रीकरण
नाशिक : केंद्र शासनाने फेब्रुवारी महिन्यापासून किमान वेतन वाढविले असताना महापालिका प्रशासनाने त्याबाबत सफाई कामगारांना माहिती न देता सध्या किमान वेतन मिळते काय असा प्रश्न करून त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले तसेच व्हिडीओ चित्रीकरण करून घेतल्याचा गंभीर आरोप नाशिक महापालिका श्रमिक सेवा संघाने केला आहे. प्रशासनाच्या या कृतीच्या निषेधार्थ शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. तसेच फेब्रुवारी महिन्यापासून प्रशासनाकडे असलेली थकबाकीची रक्कम देण्याची मागणी करण्यात आली.
नाशिक महापालिकेच्या घंटागाड्यांवर सुमारे सहाशे कामगार काम करतात. किमान वेतन कायद्यानुसार त्यांना वेतन मिळावे यासाठी पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने त्यांना साडेपाच हजार रुपये दिले असून त्यात टीए, डीए मिळून ही रक्कम अधिक मिळते.
दरम्यान असे असले तरी फेब्रुवारी महिन्यात केंद्र शासनाने किमान वेतनात वाढ केल्याने सध्या घंटागाडी कामगारांना साडेअकरा हजार रुपये किमान वेतन तर अन्य भत्ते धरून साडे चौदा हजार रुपये देणे अपेक्षित आहे. परंतु ही वाढ प्रशासनाने केली नाहीच उलट बुधवारी पाथर्डी शिवारातील कचरा डेपोवर कचरा टाकण्यासाठी गेलेल्या कामगारांना आरोग्याधिकारी डॉ. डेकाटे यांनी आपल्या केबीनमध्ये बोलावले आणि किमान वेतन मिळते का असे विचारले आणि कामगारांकडून अर्ज भरून घेतले. वास्तविक, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या वाढीबाबत त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही आणि कर्मचाऱ्यांचे व्हिडीओ चित्रीकरण करून घेतले.
विशेष म्हणजे वाढीव किमान वेतन या कामगारांना द्यावे यासाठी कामगार उपआयुक्तांनी महापालिका प्रशासनाशी वेळोवेळी पत्र व्यवहार केला आहे. परंतु तरीही त्याचा उपयोग झालेला नाही आणि दुसरीकडे हे वेतन अदा करत नसताना नोंद मात्र तशी केली आहे. २१ भरपगारी रजा कामगारांना दिल्या जात नसल्याने किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी होत नसताना दुसरीकडे मात्र दिशाभूल करून कर्मचाऱ्यांकडून फॉर्म भरून घेण्यात आले असा आरोप संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी केला आहे.
यासंदर्भात दुपारी बी. डी. भालेकर मैदान येथून महापालिकेपर्यंत मोर्चा काढण्यात आला आणि आयुक्तांना निवेदन देण्यात आले. मोर्चात सफाई कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली. (प्रतिनिधी)