चमत्कार करणाऱ्या भोंदूंची भंबेरी
By Admin | Updated: April 11, 2015 00:30 IST2015-04-11T00:22:06+5:302015-04-11T00:30:57+5:30
प्रसंगावधान : गंडवण्याआधीच साधू चेहेडीतून पसार

चमत्कार करणाऱ्या भोंदूंची भंबेरी
नाशिक : प्रसंगावधान राखल्यास भोंदूगिरीला कसा आळा घातला जाऊ शकतो, याचे उदाहरण चेहेडीतील दोन महिलांनी समाजासमोर ठेवले. गावात येऊन लोकांना गंडवू पाहणाऱ्या दोघा भोंदूंचे खरे रूप या महिलांनी समोर आणल्यावर या भोंदूंची अक्षरश: भंबेरी उडाली.
औरंगाबाद रस्त्यावरील चेहेडी गावात एका जीपमधून सहा साधू दाखल झाले. त्यांनी गावातील पारावर देवतांचे फोटो लावले व देवदेवतांच्या नावाने जयघोष सुरू केला. त्यामुळे तेथे गावकरी जमा झाले. हिंदी भाषेत बोलणाऱ्या एका साधूने आपले नाव प्रेमगिरी महाराज, तर दुसऱ्याने गोपालगिरी सांगितले. एका साधूने विरुद्ध दिशेला तोंड करीत येणारे भाविक स्री वा पुरुष असल्याचे ओळखल्याने काहींचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यांनी गावकऱ्यांकडे धान्य, पैशांची मागणी केली. काही महिलांनी त्यांना देण्यासाठी धान्यही आणले. आपण आणलेल्या फोटोतील साईबाबांच्या डोळ्यातून कुंकू वा रक्त बाहेर येणार असल्याचे व नारळ पेटविणार असल्याचे साधूंनी सांगितले. ‘बार्टी’ संस्थेच्या समतादूत मंगला गायकवाड व अनिता उगले या तेथे उपस्थित होत्या. अंनिसच्या प्रशिक्षण शिबिरात त्यांनी या चमत्कारांचे प्रात्यक्षिक पाहिले होते. त्यामुळे त्यांनी तत्काळ अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांच्याशी संपर्क साधला. तसेच साधूंना प्रश्नही विचारले. त्यांची छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली, असे चमत्कार आम्हीदेखील करू शकत असल्याचे आव्हान त्यांनी गावकऱ्यांसमोर साधूंना दिले. त्यावर मात्र साधूंची घाबरगुंडी उडाली आणि ते तेथून ‘आम्हाला देणगी, धान्य नको’ म्हणत पसार झाले. नंतर गायकवाड व उगले यांनी चमत्कारामागची उकल करीत उपस्थितांचे प्रबोधन केले.