अल्पवयीन मुलाकडून मजुराची हत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 00:58 IST2016-02-16T00:47:17+5:302016-02-16T00:58:22+5:30

पेठ रोडवरील घटना : मध्यरात्री घडला प्रकार

Minority killer | अल्पवयीन मुलाकडून मजुराची हत्त्या

अल्पवयीन मुलाकडून मजुराची हत्त्या

पंचवटी : पेठ रोडवरील भक्तिधामसमोर रस्त्यालगत झोपलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गारमाळ येथील सुनील तुकाराम निकुळे (३६) या युवकाची फुलेनगर येथे राहणाऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराने धारदार शस्त्राने पोटावर वार करून हत्त्या केल्याची घटना सोमवारी (दि़१५) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पसार झालेल्या संशयितास पंचवटी पोलिसांनी अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले़
याबाबत माहिती अशी की, गारमाळ येथे राहणारा सुनील निकुळे हा मजूर मोलमजुरी करण्यासाठी नाशिकला आला होता. सोमवारी रात्रीच्या सुमाराला तो भक्तिधामसमोर असलेल्या पदपथावर झोपलेला असताना पहाटे दीड वाजेच्या सुमारास अल्पवयीन गुन्हेगार तिथे आला़ या ठिकाणी झोपलेल्या अन्य मजुरांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केली असता संशयिताने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा निकुळे याने संशयिताचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयिताने निकुळेवर दगड फेकला; परंतु तरीही निकुळे पाठलाग करत असल्याचा राग आल्याने संशयित एका वाहनामागे लपला व निकुळे समोरून येताच त्याने हातातील धारदार शस्त्राने निकुळेच्या पोटावर वार केला. वर्मी घाव लागल्याने निकुळे घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला व जागीच मयत झाला. त्यानंतर संशयिताने तेथून पळ काढला. सदर प्रकार गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांना माहिती कळविण्यात आली. त्यानंतर सपकाळे यांच्या आदेशानुसार पोलीस हवलदार विजय गवांदे, आप्पा गवळी, एस. एल. वसावे, एन. जी. चव्हाण, सचिन म्हसदे, व्ही. बी. कटारे आदिंनी संशयिताचा शोध घेण्याचे काम सुरू केले. मिळालेल्या वर्णनावरून व काही दिवसांपूर्वीच पोलिसांत जिवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल असलेल्या संशयिताचे वर्णन एकच असल्याने पोलिसांनी फुलेनगरला या अल्पवयीन गुन्हेगाराच्या घरी धाव घेतली व त्यास शस्त्रासह ताब्यात घेतले. (वार्ताहर)

Web Title: Minority killer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.