अल्पवयीन मुलगी विनयभंग प्रकरणी सक्तमजुरी
By Admin | Updated: June 27, 2017 20:42 IST2017-06-27T20:42:14+5:302017-06-27T20:42:14+5:30
४ जून २०१६ रोजी ; पोस्को अन्वये गुन्हा

अल्पवयीन मुलगी विनयभंग प्रकरणी सक्तमजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी दोषी ठरलेला महेश खंडेराव बेंडकुळे (रा. जाधव संकुल, पळसे, ता. जि. नाशिक) या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एच.मोरे यांनी मंगळवारी (दि़२७) सहा महिने सक्तमजुरी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़
४ जून २०१६ रोजी अल्पवयीन मुलगी आपल्या घरात झोपलेली असताना बेंडकुळे याने घरात प्रवेश करून विनयभंग केला़ या युवतीने आरडाओरड केल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती़ या प्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़जिल्हा व सत्र न्यायाधीश मोरे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील अॅड. दीपशिखा भिडे - भांड यांनी महत्त्वाचे साक्षीदार तपासून आरोप सिद्ध केले.
न्यायाधीश मोरे यांनी बेंडकुळे यास विनयभंगाच्या गुन्ह्यात सहा महिने साधा कारावास व एक हजार रु पये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा साधा कारावास, पोस्को कायद्यान्वये सहा महिने साधा कारावास व एक हजार रु पये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा कारावास तसेच कलम ४५१ नुसार सहा महिने सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली़या शिक्षा एकत्रितपणे (कंकरंट) भोगावयाच्या असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण यांनी केला होता.