मिनी मंत्रालय ‘सुना सुना लागे रे’
By Admin | Updated: February 14, 2017 01:25 IST2017-02-14T01:25:30+5:302017-02-14T01:25:43+5:30
बहुतांश कर्मचारी : अधिकाऱ्यांची नियुक्ती

मिनी मंत्रालय ‘सुना सुना लागे रे’
नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच सोबत असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी या स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामासाठी बहुतांश कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या करण्यात आल्याने ही कार्यालये ओस पडल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत तर सर्वच विभागांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती नगण्य भासत असल्याने मिनी मंत्रालय सुने सुने भासत असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी १ ते ६ फेब्रुवारीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल, ७ फेब्रुवारीला उमेदवारी अर्जांची छाननी १३ ते १५ फेब्रुवारीपर्यंत माघारी तसेच २१ फेब्रुवारीला मतदान व २३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील अठराही विभागातील बहुतांश कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नेमणुका निवडणुकीच्या कामासाठी करण्यात आल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जी. सोनकांबळे हे दोनच अधिकारी मुख्यालयात दिसत असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचीही बहुतांश वाहने निवडणुकीसाठी अधिग्रहीत करण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील नेहमीच गजबजलेले आवार अगदी रिकामे झाल्याचे चित्र आहे. बहुतांश विभागात चार-दोन कर्मचाऱ्यांवरच दैनंदिन कामकाजाचा गाडा हाकण्याची वेळ आल्याने अनेक विकासकामांच्या नस्त्या तसेच अनेक विकासकामे व योजना प्रलंबित राहिल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)