दिंडोरी, त्र्यंबकसह समर्थ केंद्रांवर लाखोंची मांदियाळी
By Admin | Updated: August 1, 2015 00:09 IST2015-08-01T00:03:58+5:302015-08-01T00:09:16+5:30
गुरुपौर्णिमा : विविध कार्यक्रमांचा शुभारंभ

दिंडोरी, त्र्यंबकसह समर्थ केंद्रांवर लाखोंची मांदियाळी
नाशिक : श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे दिंडोरीतील प्रधान केंद्र आणि त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठासह राज्य व राज्याबाहेरील भारतातील सर्व समर्थ केंद्रांवर शुक्रवारी गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात, भावपूर्ण व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगलदिनी लाखो भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरू मानले. दिंडोरीत गुरुमाउली अण्णासाहेब मोरे, तर त्र्यंबकेश्वरमध्ये चंद्रकांत दादा मोरे यांनी भाविकांशी हितगुज करून गुरुपौर्णिमेचा संदेश दिला. यानिमित्ताने विविध कार्यक्रम, उपक्रमांचा शुभारंभही झाला.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दिंडोरी व त्र्यंबकमध्ये गुरुपौर्णिमेस प्रचंड गर्दी होणार हे निश्चित होते म्हणूनच सेवामार्गाच्या वतीने यावर्षी सोमवारपासूनच या उत्सवाचे (आषाढी एकादशीपासून) आयोजन करण्यात आले होते. आजच्या मुख्य कार्यक्रमासाठी सेवेकरी व भाविकांनी पहाटेपासून दिंडोरी, त्र्यंबकसह सर्वच समर्थ केंद्रांवर गर्दी करीत श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद घेतले. दिवसभर सर्वच केंद्रांवर अबालवृद्ध सेवेकरी, भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दिंडोरी केंद्रात अण्णासाहेब मोरे यांनी तर त्र्यंबक गुरुपीठात चंद्रकांतदादा मोरे यांनी गुरुपादुका पूजन तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे षोडशोपचार पूजन केले. सकाळी भूपाळी आरती व साडेदहा वाजता नैवद्य आरतीची सेवा लाखो सेवेकरांनी रूजू केला. सर्वच केंद्रांवर श्री स्वामी समर्थ महाराजांकडे आपले गुरुपद सोपविण्याचा कार्यक्रम शिस्तबद्धरीत्या सुरू होता. महिला-पुरुष भाविकांनी रांगेत येऊन श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीला अभिषेक केला. दिंडोरीत उपस्थित सेवेकऱ्यांशी अण्णासाहेब मोरे यांनी हितगुज केले. यावेळी दुष्काळसदृश परिस्थितीबाबत अण्णासाहेब मोरे यांनी चिंता व्यक्त केली. पर्जन्यराजाने भरघोस कृपा करावी म्हणून देशाभरातील सेवेकऱ्यांप्रमाणेच शेतकऱ्यांना गावागावात पर्जन्यसूक्ताचे सामुदायिक पाठ करावेत, अशी सूचना केली. (प्रतिनिधी)