बाजरीचे बियाणे उगवलेच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:34+5:302021-07-07T04:17:34+5:30
नांदगाव : तालुक्यातील पिंपरखेड येथील एका शेतकऱ्याने एका कंपनीचे बाजरी बियाणे पेरले,मात्र ते उगवलेच नसल्याने या शेतकऱ्याचे सुमारे एक ...

बाजरीचे बियाणे उगवलेच नाहीत
नांदगाव : तालुक्यातील पिंपरखेड येथील एका शेतकऱ्याने एका कंपनीचे बाजरी बियाणे पेरले,मात्र ते उगवलेच नसल्याने या शेतकऱ्याचे सुमारे एक लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र याचा जाब विचारण्यास गेलेल्या शेतकऱ्यास संबंधित दुकानदाराने अरेरावीची भाषा वापरत दमबाजी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
सदर दुकानदारावर शेतकऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. या नुकसानीची तालुका कृषी अधिकारी,पंचायत समितीचे कृषी अधिकारी,संबंधित कंपनीचे अधिकारी यांनी संबधित दुकानदाराला घेऊन पाहणी केली.
भागवत गरुड या शेतकऱ्याने नांदगाव शहरातील बाजार समिती गाळ्यांमध्ये असलेल्या एका दुकानातून बाजरी बियाणे घेऊन जून महिन्यात पेरले होते. मात्र पेरणीनंतर एक महिन्याचा कालावधी उलटून ही बियाणे उगवले नसल्याने सदर बाब भागवत गरुड व शिवसेना युवा नेते जीवन गरुड यांनी दुकानाचे मालकांच्या कानावर घातली, मात्र यावर तोडगा काढण्याऐवजी दुकान मालकाने सदर शेतकऱ्यास दमबाजी केली. हतबल झालेल्या या शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी, पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती मध्ये जाऊन आपली कैफियत ऐकवली.
कोट....
बियाणे निकृष्ट दर्जाचे
तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी चौधरी, थोरात, कंपनीचे विक्री अधिकारी यांनी सदर दुकानदारास सोबत घेऊन पिंपरखेड येथील या शेतकऱ्याच्या शेतात भेट देऊन पाहणी केली. सदर बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे कृषी विभागाच्या शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयास व कंपनीला पाठवण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी सांगितले. या अहवालाची एक प्रत सदर शेतकऱ्याला देण्यात येईल, त्या आधारे सदर कंपनी विरोधात ग्राहक मंचाकडे दाद मागता येईल.