कोट्यवधींची उलाढाल
By Admin | Updated: April 22, 2015 01:40 IST2015-04-22T01:40:20+5:302015-04-22T01:40:46+5:30
कोट्यवधींची उलाढाल

कोट्यवधींची उलाढाल
नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेला शहरात सोन्या-चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने व बांधकाम क्षेत्रात कोट्यवधींची उलाढाल झाली. विशेषत: लग्नसराईमुळे सराफी पेढ्यांमध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
हिंदू धर्मात अक्षयतृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा मुहूर्त साधत ग्राहकांनी दिलखुलास खरेदी केली. सराफ बाजारात गुंतवणूक म्हणून सोने घेणाऱ्यांनी गर्दी केली होती. वेढणे, बिस्किटे खरेदी केली जात होती. याशिवाय दोन ग्रॅम सोन्यापासून बनवलेल्या दागिन्यांची खरेदीही सुरू होती. इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत एसी, कूलर्स, रेफ्रीजरेटर, एलइडी या वस्तूंना सर्वाधिक मागणी होती. वॉशिंग मशीन, मिक्सर, घरगुती आटा चक्की आदिंचीही विक्री झाली. वाहनबाजारात दुचाकी व चारचाकी गाड्यांची नोंदणी लोकांनी आधीच करून ठेवली होती. ही वाहने मंगळवारी मुहूर्तावर घरी नेण्यात आली. याशिवाय मोबाइलच्या बाजारपेठेतही मोठी उलाढाल झाली. बाजारात दाखल झालेले नवनवीन मोबाइल्स खरेदी करण्यासाठी नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाली होती. मंगळवारी शहरातील अनेक दुकाने बंद असतात. आज मात्र अक्षयतृतीयेमुळे दुकाने खुली होती. त्यामुळे बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या. (प्रतिनिधी)