दुधाची टंचाई, चहासाठी भटकंती
By Admin | Updated: September 25, 2015 22:30 IST2015-09-25T22:28:55+5:302015-09-25T22:30:33+5:30
दुधाची टंचाई, चहासाठी भटकंती

दुधाची टंचाई, चहासाठी भटकंती
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या आणि अखेरच्या शाही पर्वणीला लक्षावधी भाविकांनी हजेरी लावली आणि गावातील हॉटेल्ससह खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या व्यवसायात प्रचंड आर्थिक उलाढाल झाली. वाढत्या गर्दीमुळे अनेक हॉटेल्समधील दुधाचा साठा संपला आणि चहाची तलफ भागविण्यासाठी भाविकांना भटकंती करावी लागली.
तिसऱ्या शाही पर्वणीला गुरुवारीच भाविकांनी त्र्यंबकेश्वरी दाखल होत तीर्थराज कुशावर्तावर स्नान केले. त्यानंतर शाही मिरवणुकीचा सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी भाविकांनी मिळेल तेथे जागा पटकावली. दरम्यान, त्र्यंबकेश्वरमधील हॉटेल्स भाविकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाल्याचे बघायला मिळाले. त्र्यंबकेश्वरातील एकमेव तारांकित हॉटेल्सही पूर्णपणे आरक्षित झालेले होते. छोट्या स्वरूपातील चहाच्या ठेल्यांवरही चहापानासाठी भाविकांची भरगच्च गर्दी होती. शाही मिरवणूक मार्गावरील हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. मात्र, सकाळच्या सुमारास गावातील बहुसंख्य हॉटेल्स व चहाच्या टपऱ्यांवरील दुधाचा साठा संपल्याने चहाची तलफ भागविताना अनेकांची मोठी अडचण झाली. गावात जागोजागी चहाबाबत विचारणा करण्यात येई त्यावेळी दूध शिल्लक नसल्याचे सांगितले जायचे. त्यामुळे चहासाठी भाविकांना भटकंती करावी लागली. ज्याठिकाणी चहा उपलब्ध होता तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली.