गोदाकाठ भागाची सैन्य दलाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:15 IST2021-07-27T04:15:25+5:302021-07-27T04:15:25+5:30
चांदोरी : इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह धरणग्रस्त क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की दारणा व गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग ...

गोदाकाठ भागाची सैन्य दलाकडून पाहणी
चांदोरी : इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह धरणग्रस्त क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की दारणा व गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. यामुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागात पूरपरिस्थिती निर्माण होत असते. याच पार्श्वभूमीवर देवळाली कॅम्प सैन्य दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांनी संभाव्य पूरभागाची पाहणी केली. कोल्हापूर, सांगली, चिपळूण या भागात निर्माण झालेल्या भयंकर पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असावे यासाठी देवळाली कॅम्प येथील लेफ्टनंट कर्नल ध्यानचंद व लेफ्टनंट सचिन सकपाळ यांनी टीमसह चांदोरी, सायखेडा या पूरग्रस्त भागाला भेट दिली. चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या ताब्यात असलेल्या शोध व बचाव कार्य करण्यासाठी असलेल्या साहित्याची पाहणी करत काही उपयुक्त सूचना केल्या. पूरपरिस्थितीमध्ये सुरक्षित ठिकाणाची पाहणी केली. गावांचा संपर्क तुटल्यानंतर अन्न व औषध पुरवठा कोणत्या मार्गाने करता येईल याची चाचपणी करण्यात आली. याप्रसंगी माजी सैनिक तुषार खरात, उपसरपंच शिरीष गडाख, आपत्ती व्यवस्थापन समितिचे सागर गडाख, बाळू आंबेकर, फकिरा धुळे, विलास गांगुर्डे, किरण वाघ, विलास सूर्यवंशी, विलास गडाख आदी उपस्थित होते.
---
संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास मदतकार्य करण्यासाठी सैन्य दलासोबत काम करण्यासाठी चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समितीचे स्वयंसेवक सज्ज आहेत.
- सागर गडाख,
अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन समिती, चांदोरी
-----------------
सैन्य दलाच्या अनुभवाचे मार्गदर्शन घेत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीला सोबत घेऊन गोदाकाठ भागाची पाहणी करत सूचना केल्या.
- तुषार खरात, माजी सैनिक
(२६ चांदोरी)
260721\26nsk_35_26072021_13.jpg
२६ चांदोरी