मिलिंद शंभरकर आज पदभार स्वीकारणार?
By Admin | Updated: November 19, 2015 00:06 IST2015-11-19T00:06:09+5:302015-11-19T00:06:54+5:30
मिलिंद शंभरकर आज पदभार स्वीकारणार?

मिलिंद शंभरकर आज पदभार स्वीकारणार?
नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झालेले मुंबईचे अपर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे गुरुवारी (दि. १९) पदभार स्वीकारणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात काल होती.
गेल्या दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची नाशिकला बदली झाली होती. त्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये त्यांची अचानक बदली करण्यात येऊन त्यांच्या जागी मूळचे जळगावचे असलेले चौधरी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी बदली करण्यात आली होती. त्यावेळेस मात्र अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांच्यासह उपाध्यक्ष प्रकाश वडजे तसेच आमदार सीमा हिरे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन येऊ घातलेल्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुखदेव बनकर यांची बदली रद्द करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी काही कर्मचारी संघटनांसह राजकीय पक्षांनीही आंदोलन करून सुखदेव बनकर यांची बदली रद्द करण्याची मागणी केली होती. आगामी सिंहस्थ कुंभमेळा पाहत नव्याने रूजू होण्यास आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेत येऊन पदभार न स्वीकारताच रिकाम्या हाती परतावे लागले होते. आता सिंहस्थ कुंभमेळ्याची धामधूम संपताच मंत्रालयातून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची कार्यवाही पुन्हा सुरू झाली आहे. सुखदेव बनकर यांनी त्यांच्या कामकाजामुळे जिल्हा परिषदेला नुकताच राज्यस्तरीय पंचायत राज अभियानातील दुसऱ्या क्रमाकांचा पुरस्कार मिळवून दिला होता. त्यामुळे त्यांच्या बदलीमुळे पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)