मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही स्थलांतराचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:43 IST2017-07-22T00:43:04+5:302017-07-22T00:43:17+5:30
सिडको : येथील सिडको प्रशासकीय कार्यालय येत्या १ आॅगस्टपासून बंद करण्याच्या निर्णयामुळे सिडकोतील नागरिकांनी त्यास विरोध केला असून, आमदार सीमा हिरे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही स्थलांतराचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : येथील सिडको प्रशासकीय कार्यालय येत्या १ आॅगस्टपासून बंद करण्याच्या निर्णयामुळे सिडकोतील नागरिकांनी त्यास विरोध केला असून, आमदार सीमा हिरे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी सदर कार्यालयाला तुर्तास स्थगिती देण्यात यावी, असा शेरा आमदार हिरे यांच्या पत्रावर मारला होता. असे असले तरी मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्यालय स्थलांतराच्या स्थगितीबाबत कार्यालयाशी कोणताच पत्रव्यवहार नसल्याचे कारण पुढे करीत सिडको प्रशासनाने शुक्रवारी नाशिकमधील सिडको कार्यालयातील कागदपत्रे आणि इतर साहित्य औरंगाबादला नेण्याची कारवाई सुरू केली होती. सदर बाब नागरिक संघर्ष समितीला समजल्यानंतर त्यास तीव्र विरोध केला. कार्यालयात आलेल्यांनीदेखील विरोध दर्शविला.
आमदार सीमा हिरे यांनी तातडीने मुख्य प्रशासक भूषण गगरानी यांच्याशी संपर्क साधत नाशिक कार्यालयातील कागदपत्रे हलविली जात असल्याच्या त्यांच्या निदर्शनास आणून दिले. शिवाय नाशिक सिडको कार्यालयाला स्थगितीचे आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याचेही त्यांना सांगितले. त्यानंतर गगरानी यांनी नाशिक सिडकोचे प्रशासक कांचन बोधले यांना तातडीने कारवाई स्थगित करण्याचे सांगत गाडीत ठेवलेली कागदपत्रे पुन्हा उतरवून घेण्याच्या सूचना केल्या. समितीच्या प्रयत्नानंतर स्थलांतराचा प्रयत्न फसला असला तरी ही कारवाई तात्पुरती थांबविण्यात आली की कायमची, याची मात्र कोणतीही शाश्वती नसल्याने स्थलांतराची टांगती तलवार कायम आहे. याप्रसंगी नागरिक संघर्ष समितीचे गणेश पवार, धनंजय बुचडे, माणिक जायभावे, विश्वास अरिंगळे, अमोल सोनार, जावेद शेख, योगेश सोनगिरे, राजेंद्र खानकरी, प्रेमानंद जेधे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.