निमाणी बसस्थानक स्थलांतरित करा
By Admin | Updated: October 9, 2015 23:59 IST2015-10-09T23:59:09+5:302015-10-09T23:59:31+5:30
आयुक्तांसमवेत बैठक : पालकांनी केली मागणी

निमाणी बसस्थानक स्थलांतरित करा
नाशिक : पंचवटीतील सेवाकुंज परिसरात गेल्या बुधवारी बसखाली चिरडून रोनित चौहान या बालकाचा बळी गेल्यानंतर आर.पी. विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पालक तसेच परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेत विविध सूचना मांडल्या. यावेळी निमाणी बसस्थानक आडगाव आगारमध्ये स्थलांतरित करावे आणि सेवाकुंज परिसरात पादचारी पूल उभारण्याची मागणी करण्यात आली.
गेल्या बुधवारी रोनित चौहान या शालेय विद्यार्थ्याचा बसखाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. परिसरातील आर. पी. विद्यालयातील पालक तसेच नागरिकांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे आदि उपस्थित होते. यावेळी आर. पी. विद्यालयाजवळ रस्त्यावर त्वरित रॅम्बलर टाकावेत, बंद पडलेला सिग्नल सुरू करण्यात यावा, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत होणाऱ्या भाजीपाला वाहनांची वाहतूक रासबिहारी शाळेमार्गे वळविण्यात यावी तसेच सेवाकुंज याठिकाणी पादचारी पूल उभारण्यासाठी सर्वेक्षण करावे आदि मुद्यांवर ऊहापोह झाला. त्याचबरोबर वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरलेले निमाणी बसस्थानक आडगाव येथील बस आगारात स्थलांतरित करावे आणि बसआगार निमाणी बसस्थानक परिसरात आणावेत. त्यामुळे निमाणीजवळील वाहतूक कोंडी कमी होईल, अशी सूचनाही पुढे आली. या सूचनांवर विचार करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. (प्रतिनिधी)