गोदाघाटावर मध्यरात्री आयुक्तांची स्वारी

By Admin | Updated: February 27, 2015 00:01 IST2015-02-27T00:01:03+5:302015-02-27T00:01:04+5:30

प्रदूषणाचा धसका : अधिकाऱ्यांची उडविली झोप; ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर स्वच्छतेचे दिले आदेश

Midnight Commissioner's invasion of Godaghat | गोदाघाटावर मध्यरात्री आयुक्तांची स्वारी

गोदाघाटावर मध्यरात्री आयुक्तांची स्वारी

नाशिक : बुधवारी मध्यरात्री १२ वाजेची वेळ. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची पावले गोदाघाटाकडे वळतात आणि अस्वच्छ, प्रदूषित गोदावरीचे आपल्या मोबाइल कॅमेऱ्यावरून धडाधड छायाचित्रे क्लिक करत अधिकाऱ्यांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर पाठविले जातात आणि सोबत असतो गोदावरी स्वच्छता मोहीम तातडीने राबविण्याचा संदेश. येत्या शनिवारी (दि.२८) उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि शुक्रवारी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह एका चर्चासत्राच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यांना प्रदूषित गोदावरीचे दर्शन घडू नये आणि महापालिकेच्या अकार्यक्षमतेचे धिंडवडे निघू नयेत म्हणून हा सारा खटाटोप. गोदा प्रदूषणाचा धसका घेतलेल्या आयुक्तांनी अधिकाऱ्यांची मध्यरात्री झोप उडविली आणि गुरुवारी सकाळपासूनच गोदाघाट स्वच्छतेसाठी यंत्रणा कामाला लागली.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणाचा कळीचा मुद्दा बनला आहे. पर्यावरणप्रेमींनी गोदावरी नदीच्या प्रदूषणासंबंधी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत, तर राष्ट्रीय हरित लवादानेही वेळोवेळी गोदा प्रदूषणाबाबत महापालिकेला फटकारले आहे. संत-महंतांसह आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनीही अस्वच्छ गोदावरीबद्दल नापसंती दर्शविलेली आहे. त्यानंतर काही स्वयंसेवी संस्थांसह शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी गोदास्वच्छतेसाठी आपला खारीचा वाटा उचलत आहेत. तरीही गोदावरीची अस्वच्छतेमुळे घुसमट सुरूच आहे. महापालिका प्रशासन मात्र वरवर मलमपट्टी करण्यातच धन्यता मानताना दिसून येत आहे. दरम्यान, येत्या शनिवारी हरित कुंभ समिती आणि महिला वकील यांच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिरात ‘पर्यावरण कायदा व मानवी जीवन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, या चर्चासत्रासाठी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक (ज्यांच्यापुढे गोदावरी प्रदूषणासंबंधी याचिकेवर सुनावणी सुरू आहे) आणि जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लावणार आहेत. खुद्द न्यायमूर्तींसह जलतज्ज्ञ नाशिक दौऱ्यावर येणार असल्याने आणि त्यांच्याकडून गोदावरीची पाहणी केली जाण्याची शक्यता असल्याने गोदावरी प्रदूषणाचा धसका घेतलेल्या आयुक्तांनी बुधवारी मध्यरात्री थेट गोदाघाट गाठला आणि अस्वच्छ गोदावरीची धडाधड छायाचित्रे क्लिक करत अधिकाऱ्यांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर पाठवून दिले.
रात्री बारा वाजेनंतर निद्रेच्या अधीन झालेल्या अधिकाऱ्यांच्या मोबाइलवरील व्हॉट्स अ‍ॅपची ट्यून वाजायला सुरुवात झाली आणि आयुक्तांच्या आदेशाने अधिकाऱ्यांची झोप उडाली.
न्यायमूर्ती अभय ओक आणि जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह कधीही केव्हाही गोदाघाटावर भेट देण्याची शक्यता असल्याने गुरुवारी सकाळपासूनच महापालिकेची सारी यंत्रणा कामाला लावा, जास्तीत जास्त मनुष्यबळ वापरा, जेसीबी-पोकलॅण्ड जी काही मशिनरी उपलब्ध असेल, ती लावा पण गोदावरी स्वच्छ झाली पाहिजे.
या संदेशाने अधिकारी खडबडून जागे झाले आणि गुरुवारी सकाळपासून यंत्रणा कामाला लागेल, असे आयुक्तांना आश्वस्त करण्यात आले. पहाटेपर्यंत ही संदेशाची देवाणघेवाण सुरू होती. (प्रतिनिधी)

Web Title: Midnight Commissioner's invasion of Godaghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.