पुणे एक्स्प्रेसला म्हसावद थांबा
By Admin | Updated: May 4, 2016 00:54 IST2016-05-04T00:04:48+5:302016-05-04T00:54:35+5:30
दिलासा : जळगावला जाणाऱ्या प्रवाशांची सोय

पुणे एक्स्प्रेसला म्हसावद थांबा
नाशिकरोड : पुणे-भुसावळ एक्स्प्रेसला रेल्वे प्रशासनाने एक महिन्यासाठी जळगावच्या अगोदर येणाऱ्या म्हसावद रेल्वेस्थानकावर थांबा दिल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
पुणे-भुसावळ (हुतात्मा एक्स्प्रेस) ही पुण्याहून दुपारी ११.४५ वाजता सुटते. तेथून चिंचवड, लोणावळा, कर्जत, चौक, मोहपे, चिखली, पनवेल, कल्याण, इगतपुरी, देवळाली, नाशिकरोड, लासलगाव, मनमाड, चाळीसगाव, कसगाव, पाचोरा, जळगाव या रेल्वेस्थानकावर थांबत रात्री ९.५० वाजता भुसावळला पोहचते. तर भुसावळ येथून रात्री १२.२५ वाजता सुटणारी पुणे-भुसावळ एक्स्प्रेस वरील रेल्वेस्थानकावर थांबत दुसऱ्या दिवशी दुपारी १२.०५ ला पुण्याला पोहचते. पुणे-भुसावळ एक्स्प्रेस कसगावनंतर असलेल्या नगरदेवळा व पाचोऱ्यानंतर असलेल्या म्हसावद येथे थांबविण्यात यावी, अशी त्या भागातील प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी होती. जळगावचे खासदार ए.टी. पाटील यांनीदेखील प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे बोर्डाकडे नगरदेवळा व म्हसावद रेल्वेस्थानकांवर थांबा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने १ महिन्यासाठी प्रायोगिकतत्त्वावर म्हसावद रेल्वेस्थानकावर थांबा दिला असल्याचे भुसावळचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक सुधीर मिश्रा यांनी सांगितले. तर दररोज पुणे-भुसावळ प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नगरदेवळा येथेदेखील थांबत असल्याचे सांगितले आहे.
ऐन सुटीच्या काळात महिन्याभरासाठी पुणे-भुसावळ एक्स्प्रेसला जादा थांबा मिळाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. सध्या या एक्स्प्रेसला दररोज मोठी गर्दी राहात असून, खान्देशच्या प्रवाशांची मोठी सोयीची गाडी ठरत आहे. (प्रतिनिधी)