दोडी येथे म्हाळोबा महाराज यात्रोत्सव
By Admin | Updated: February 10, 2017 00:09 IST2017-02-10T00:08:55+5:302017-02-10T00:09:07+5:30
पालखी मिरवणूक : पहिल्या दिवशी स्थानिक भक्त परिवाराकडून नवसपूर्ती

दोडी येथे म्हाळोबा महाराज यात्रोत्सव
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील धनगर समाजाचे कुलदैवत व परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी स्थानिक भक्त परिवाराकडून सुमारे ३०० च्या आसपास बोकडांचा नवसपूर्तीसाठी बळी देण्यात आला.
राज्यातील धनगर समाजाचे आराध्यदैवत श्री म्हाळोबा महाराज यात्रा तीन दिवस चालणार आहे. यात्रोत्सवाला राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावतात. बुधवारी रात्री सुमारे शंभर भाविकांनी निफाड तालुक्यातल्या तामसवाडी येथून गोदावरीचे पाणी आणले. यात्रेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी सकाळी आठ वाजता कावडीद्वारे आणलेल्या गंगेचे पाणी पंचमृताने म्हाळोबा महाराज मूर्तीस स्नान घालून विधीवत पूजन करण्यात आले. पालखीतून देवाचा मुखवटा, पादुका व काठ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. भाविकांच्या खांद्यावर रंगबेरंगी काठीमहाल सजवून धनगरी ढोलांचा गजर व सनईच्या सूरात म्हाळोबा मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणूक दोडी बुद्रुक गावात येताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर चौकाचौकात महिलांनी मुखवटा व काठीमहालाचे पूजन केले. सुमारे चार तास चाललेल्या भव्य मिरणुकीत धनगर समाजाबरोबरच गावातील आबालवृद्धांसह महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. म्हाळोबा महाराजांची विधिवत पूजा करून मंदिरात मुखवट्याची स्थापना करण्यात आली. सायंकाळपर्यंत स्थानिक भगत मंडळींकडून सुमारे ३०० बोकडांचा बळी देण्यात आला. यावेळी म्हाळोबा महाराजांना नैवेद्य दाखविण्यात आला.
बोकडबळीसाठी म्हाळोबा महाराज यात्रा राज्यभर प्रसिद्ध आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी वर्षभर कबूल केलेले नवस फेडण्यासाठी भाविक दाखल होणार आहेत. मंदिरास रंगरंगोटी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बाहेरगावाहून आलेल्या काठ्यांची भव्य मिरवणूक होवून त्यांची देवभेट घडविली जाते. बोकडबळी वधगृहातच देण्याचे आदेश पोलिसांनी दिलेले आहे. मंदिर परिसरात अडथळे निर्माण केले असून, मंदिरात दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत. पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे, वावी पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलीस उपनिरीक्षक व ५० कर्मचारी
तैनात करण्यात आले आहेत.
काटेकोर बंदोबस्तासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णवाहीका व आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शुक्रवारी व शनिवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता
आहे. (वार्ताहर)