मेट्रो रेल्वे सुसाट; लोकल अडकली घाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:42 IST2021-02-05T05:42:51+5:302021-02-05T05:42:51+5:30

नाशिक: केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात अखेर नाशिकला मेट्रो रेल्वे जाहीर करण्यात आल्याने प्रदीर्घ कालावधीपासून सुखद घोषणेच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांना ...

Metro Rail Susat; Local stuck in the ghats | मेट्रो रेल्वे सुसाट; लोकल अडकली घाटात

मेट्रो रेल्वे सुसाट; लोकल अडकली घाटात

नाशिक: केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात अखेर नाशिकला मेट्रो रेल्वे जाहीर करण्यात आल्याने प्रदीर्घ कालावधीपासून सुखद घोषणेच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांना अर्थमंत्र्यांनी दिलासा दिला. याशिवाय काही दिवसांपूर्वीच पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर मंजुरीला आल्याने नाशिकच्या रेल्वे विकासाला चालना मिळण्याचा मार्ग सुकर होतांना दिसत आहे. दुसरीकडे नाशिककरांचा नाशिक ते मुंबई लोकलचा प्रवास मात्र अजूनही दूरच दिसत आहे.

तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाशिकमध्ये बॉटलिंग प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली होती. तेंव्हाही नाशिकरांमध्ये आनंद पसरला होता. परंतु त्यांचा हा आनंद औट घटकेचा ठरला आणि हा प्रकल्प गुंडाळण्यात आला. त्यावेळी रेल्वे बजेटवर नाशिकरांनी टीका केली होती. मॉडेल स्टेशनची घाेषणाही अशीच बाजूला पडली होती. कुंभमेळ्याच्या निमित्ताने मात्र रेल्वेस्थानकाचा कायापालट होऊन गेला. रेल्वेगाड्यांच्या चाकांचे स्प्रिंग बनविण्याचे युनिटही एकलहरेत सुरू होत आहे. मागीलवर्षी यासाठीची जागा आणि शेडडोम तयार करण्यात आला असून आता मशीनरीची प्रतीक्षा आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी रेल्वे अर्थसंकल्पात नाशिकसाठी जाहीर केलेल्या मेट्रोच्या घोषणेमुळे नाशिककरांमध्ये चैतन्य पसरल्याचे दिसते. मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये मेट्रोचे प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे नाशिकला देखील मेट्रोची घोषणा होण्याची प्रतीक्षा होती. आता प्रत्यक्षात मेट्रो कधी धावते याकडे नाशिककरांचे लक्ष असणार आहे. मध्यंतरी नाशिककरांना काही तासात मुंबई गाठता यावी यासाठी व्यापक प्रयत्न झाले. लोकलचे कोचदेखील दाखल झाले होते. परंतु कसारा घाटातून लोकल ‘पास’ करण्याची चाचणी तिनदा ‘नापास’ झाली. त्यामुळे नाशिकला लोकल मिळण्याचे स्वप्न अधुरे राहिले. मेट्रोच्या रुपाने नाशिककरांना काहीतरी मिळू शकले याचा आनंद नाशिककरांनी मनापासून व्यक्त केली.

सुवर्ण त्रिकोणातील शहर म्हणून नाशिकच्या विकासासाठी दळणवळणाच्या साधनांची व्यवस्था होण्याबाबत अनेकदा औद्योगिक क्षेत्राकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यामुळे नाशिमधून विमानसेवा सुरू झाली. लोकलमुळे मुंबई आणखी जवळ आणण्ायचेही प्रयत्न झाले. आता मेट्रोमुळे दिलासा मिळाला आहे. नाशिक ते पुणे रेल्वेने अवघ्या दोन तासांत पोहोचणे नजीकच्या भविष्यात शक्य होऊ शकणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला ‘ग्रीन सिग्नल’ दिला असून, आता हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीला पाठविला जाणार आहे.

--केाट--

नाशिकसाठी मेट्रो सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागतच आहे. मुंबई, पुणे, नागपूरनंतर नाशिकला मेट्रोची चर्चा सुरू झाली होती. आता घोषणा झाल्याने प्रत्यक्षात काम सुरू देखील होणे अपेक्षित आ हे. गेल्या २३ वर्षापासून नाशिक-पुणे रेल्वेसाठीची चर्चा होत आहे. तसे या प्रकल्पाबाबत होऊ नये असे वाटते. आधुनिक रेल्वेस्थानकासाठीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्ललप करण्याची देखील गरज आहे.

- राजेश फोकणे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती.

-

Web Title: Metro Rail Susat; Local stuck in the ghats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.