सेनेचे सदस्य सहलीला, अपक्ष नाशिकलाच?
By Admin | Updated: April 4, 2017 01:35 IST2017-04-04T01:35:15+5:302017-04-04T01:35:29+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या ५ एप्रिलच्या विषय समिती सभापती निवडणुकीसाठी सोमवारी (दि. ३) सायंकाळी शिवसेनेचे सदस्य व पदाधिकारी सहलीला रवाना झाले

सेनेचे सदस्य सहलीला, अपक्ष नाशिकलाच?
नाशिक : जिल्हा परिषदेच्या ५ एप्रिलच्या विषय समिती सभापती निवडणुकीसाठी सोमवारी (दि. ३) सायंकाळी शिवसेनेचे सदस्य व पदाधिकारी सहलीला रवाना झाले, तर शिवसेनेला मदत करणारे दोघे अपक्ष रूपांजली माळेकर व शंकर धनवटे सभापतिपदाचा शब्द सोडविण्यासाठी नाशिकलाच थांबल्याचे समजते. तिकडे कॉँग्रेसच्या सदस्यांचीही सायंकाळी उशिरापर्यंत जुळवाजुळव करण्याचे काम शिवसेना व कॉँग्रेसचे नेते करीत असल्याचे चित्र होते.
येथील शासकीय विश्रामगृहावरून सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य सहलीला रवाना झाल्याचे समजते. सायंकाळी सहलीला गेलेल्या सदस्यांमध्ये माजी आमदार गटनेते धनराज महाले, सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, दीपक शिरसाट यांच्यासह जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, माजी गटनेते प्रवीण जाधव यांच्यासह काही जणांचा पहिला गट सहलीला रवाना झाल्याचे समजते. भाऊलाल तांबडे यांनी सेनेच्या सहलीला २५ सदस्य उपस्थित असल्याचा दावा केला आहे.
प्रत्यक्षात सदस्य भास्कर गावित, हेमलता गावित यांच्यासह काही सदस्य सायंकाळी उशिरापर्यंत नाशिकलाच पोहचले नसल्याची चर्चा होती. दुसरीकडे अपक्ष जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे व रूपांजली माळेकर यांचे पती विनायक माळेकर यांनी राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन सभापतिपदाबाबत विचारणा केल्याचे समजते. सोमवारी दिवसभर चर्चेचे केंद्रबिंदू गंगापूर नाक्यावरील एका अपक्ष सदस्याचे निवासस्थान असल्याचे समजते. तिकडे दिंडोरी व पेठ तालुक्यातून शिवसेनेचे सहा जिल्हा परिषद निवडून आल्याने येथून एका सभापतिपदाची मागणी शिवसेना सदस्यांनी केली आहे. त्यातही दुसऱ्यांदा निवडून आलेले भास्कर गावित की माजी आमदार धनराज महाले यांच्यातून एकाची निवड करण्यावरून सेनेच्या नेत्यांची डोकेदुखी वाढल्याची चर्चा होती. शिवसेना व कॉँग्रेसच्या नेत्यांनी कॉँग्रेसच्या आठ सदस्यांची रात्री उशिरापर्यंत जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)