मेहेर, भवानी सर्कल वाहतूक मार्गात बदल
By Admin | Updated: December 22, 2016 00:03 IST2016-12-22T00:02:44+5:302016-12-22T00:03:19+5:30
वारंवार अपघात : वाहतुकीचा ताण कमी करणार

मेहेर, भवानी सर्कल वाहतूक मार्गात बदल
नाशिक : सर्वाधिक वर्दळीच्या मेहेर व भवानी सर्कल परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने या मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचना पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी प्रसिद्धीस दिली आहे़ मेहेर सिग्नल, गोळे कॉलनी परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने येथील वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत़ त्यात मेहेर हॉटेलजवळील एलआयसी कार्यालयाकडे जाणारा मार्ग वाहनचालकांसाठी बंद करण्यात आला असून मेहेर सिग्नलच्या बाजूने बिझनेस बँकेकडून गोळे कॉलनीत जाणारा रस्ता हा एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर गोळे कॉलनीकडून बिझनेस बँकेजवळून मेहेरकडे जाणाऱ्या वाहतुकीस प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गोळे कॉलनीतून बाहेर जाण्यासाठी गद्रे मंगल कार्यालयाकडून किंवा सारस्वत बँकेसमोरील रस्त्याचा वापर करून वाहनचालकांना गंगापूररोडच्या दिशेने जाता येईल़
मेहेर सर्कलप्रमाणेच भवानी सर्कल परिसरात येणारा मोडक सिग्नल, चांडक सर्कल, उंटवाडी, त्र्यंबकेश्वरकडून येणारी वाहतूक तसेच होलाराम कॉलनीकडून येणाऱ्या वाहतुकीचा ताण येतो व अपघातही घडतात़ त्यामुळे त्र्यंबकरोडवरील जुना सीटीबी सिग्नलकडून होलाराम कॉलनीत जाण्यासाठी वाहन चालकांना डावे वळण घेऊन जाण्यास वाहतूक शाखेने परवानगी दिली आहे. मात्र, जलतरण तलाव, चांडक सर्कल, उंटवाडी रोडकडून येणाऱ्या वाहनचालकांना भवानी सर्कलवरून विरुद्ध मार्गाने प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांना जुन्या सीटीबी सिग्नलकडून पुन्हा होलाराम कॉलनीकडे जाण्याची मुभा देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)