एकमतासाठी बैठकांचा फार्स : रविवारी पुन्हा बैठक

By Admin | Updated: April 15, 2017 23:37 IST2017-04-15T23:36:55+5:302017-04-15T23:37:23+5:30

महत्त्वाच्या विषय समित्यांमधून कॉँग्रेस ‘आउट’?

Meetings for unity: Meeting again on Sunday | एकमतासाठी बैठकांचा फार्स : रविवारी पुन्हा बैठक

एकमतासाठी बैठकांचा फार्स : रविवारी पुन्हा बैठक

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांवर सदस्यांची वर्णी लावण्यासाठी त्या त्या पक्षांचे संख्याबळ गृहीत धरण्यावर सर्वच राजकीय पक्षांचे एकमत झाल्याचे वृत्त आहे. तथापि, महत्त्वाच्या स्थायी समितीसह बांधकाम व जलसंधारण समितीमधून कॉँग्रेसला स्थान मिळणे अवघड असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, शनिवारी (दि.१५) दिवसभर शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांसह सदस्यांनी हजेरी लावत बैठकांवर बैठकांचा फार्स केला. सायंकाळपर्यंत विषय समित्यांचे खातेवाटप वगळता विषय समिती सदस्यांच्या निवडीवर सर्वच पक्षांचे एकमत झाल्याचे समजते. स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड करण्यात येणार असून, त्यात संख्याबळानुसार शिवसेनेला तीन, तसेच भाजपा व राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन सदस्यांचा कोटा दिल्याचे समजते.
उर्वरित एका सदस्याची निवड कॉँग्रेसमधून की अपक्षांमधून करावी, याबाबत एकमत झाले नसल्याचे समजते. जलसंधारण समितीच्या सहा सदस्यांची निवड करताना संख्याबळानुसार शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन सदस्यांची वर्णी लावण्यावर एकमत झाले असून, त्यातून ‘तीन महिला कोणत्या’ हा विषय प्रलंबित असल्याचे कळते. बांधकाम समितीवर आठ सदस्यांची निवड करावयाची असून, त्यात राष्ट्रवादीला झुकते माप मिळण्याची चिन्हे असून, सर्वाधिक तीन, तर त्या पाठोपाठ भाजपा व शिवसेनेला प्रत्येकी दोन सदस्यांची वर्णी बांधकाम समितीवर लावण्यात येणार आहे.
या समितीवरही कॉँग्रेसऐवजी अपक्षाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे स्थायी, बांधकाम व जलसंधारण अशा महत्त्वाच्या समितीतून कॉँग्रेसच्या एकाही सदस्याची वर्णी न लागल्यास महत्त्वाच्या समित्यांमधून कॉँग्रेस आउट होणार असल्याची चर्चा आहे. शनिवारी सायंकाळी पुन्हा जिल्हा परिषदेच्या आवारात भाजपा व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हजेरी
लावत विषय समिती खातेवाटपाबाबत चर्चा केल्याचे समजते. (प्रतिनिधी)

Web Title: Meetings for unity: Meeting again on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.