चणकापूर-झाडी एरंडगाव कालव्याप्रश्नी उमराणेत पाणी पक्ष चळवळीची बैठक
By Admin | Updated: September 29, 2015 00:03 IST2015-09-29T00:01:42+5:302015-09-29T00:03:35+5:30
चणकापूर-झाडी एरंडगाव कालव्याप्रश्नी उमराणेत पाणी पक्ष चळवळीची बैठक

चणकापूर-झाडी एरंडगाव कालव्याप्रश्नी उमराणेत पाणी पक्ष चळवळीची बैठक
उमराणे : चणकापूरचे पाणी झाडी- एरंडगाव धरणात पडेपर्यंत आंदोलनाचा लढा सुरू ठेवणार असल्याचे प्रतिपादन चणकापूर-झाडी-एरंडगाव वाढीव कालव्याच्या नियोजन संदर्भात आयोजित बैठकीप्रसंगी पाणीपक्ष चळवळीचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी केले.
पस्तीस ते चाळीस वर्षांपासून प्रलंबित परंतु देवळा तालुक्यातील पूर्व भागातील जनतेचा जिव्हाळ्याचा असलेला चणकापूर झाडी-एरंडगाव कालवा सद्यस्थितीत दहिवडपर्यंत येऊन ठेपला आहे. या कालवा पुर्णत्वासंबंधी शासन स्तरावरुन पाहिजे त्या प्रमाणात दखल घेतली जात नसल्याने दहिवडपासून ते झाडी धरणापर्यंतचे १२ कि.मी.चे काम अद्यापी अपूर्णच आहे. परिणामी या भागातील जनतेला चणकापूर कालव्याच्या पाण्याची प्रतिक्षा आहे. या कालव्याचे काम त्वरित सुरू होऊन झाडी धरणात चणकापूर कालव्याचे पाणी पडावे यासाठी उमराणे येथे देवळा तालुक्यातील पिंपळगाव, वाखारी, दहिवड, मेशी, सांगवी, कुंभार्डे, चिंचवे, गिरणारे, तिसगाव, वऱ्हाळे, झाडी, एरंडगाव, सावकारवाडी आदि गावातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना बैठकीस बोलविण्यात आले होते.
यावेळी दिलीप पाटील, केदा शिरसाठ यांनी कालव्याविषयी विस्तृत माहिती विषद करून एकत्रित लढा देण्याचे आवाहन केले. तसेच निंबा वाघ, साहेबराव सूर्यवंशी, छबू ठोके, आबा साळुंके, शिवाजी ठाकरे, धर्मा देवरे, देवानंद वाघ, सुधाकर गांगुर्डे, मनेश ब्राम्हणकार, विजयाताई खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रलंबित चणकापूर झाडी एरंडगाव कालवा पुर्णत्वाच्या प्रश्नाला वाचा फोडून एकत्रितपणे सर्वांनी लढा देणे गरजेचे आहे. याकामी सर्वांनी पक्षभेद विसरून काम
करावे.
आजपर्यंत छोटे-मोठे लढे देऊनही प्रश्न मार्गी लागला नसल्याने येथून पुढील लढा हा आगळावेगळा लढा असून जोपर्यंत चणकापूरचे पाणी झाडी धरणात पडणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे खंडू देवरे यांनी सांगितले. बैठकीप्रसंगी देवळा तालुक्यातील पुर्व गावातील सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. टी. पाटील यांनी केले. (वार्ताहर)