भुजबळांच्या नेतृत्वाखाली मनसेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
By Admin | Updated: November 9, 2014 01:24 IST2014-11-09T01:23:21+5:302014-11-09T01:24:06+5:30
भुजबळांच्या नेतृत्वाखाली मनसेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

भुजबळांच्या नेतृत्वाखाली मनसेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
नाशिक : यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना ज्या मनसे नेत्यांनी आडवे हात घेतले त्याच भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे महापौर आणि शहराध्यक्षांसह अन्य पालिका पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यामुळे राजकीय क्षेत्रातील जाणकारांच्या भुवया उंचवाल्या गेल्या. विशेष म्हणजे, मनसे पदाधिकाऱ्यांवर यासंदर्भात टीका करणारे गटनेता अशोक सातभाईदेखील याच शिष्टमंडळात सहभागी होते.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षात छगन भुजबळ यांना लक्ष्य केले. इतकेच नव्हे, तर त्यांच्यावर टीका करूनच पालिकेची सत्ता हस्तगत केली. परंतु त्याच मनसेच्या महापौरादी मंडळींना अखेरीस छगन भुजबळ यांच्याकडे कुंभमेळा निधीसाठी मदतीची याचना करण्याची वेळ आली. बुधवारी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह अन्य पालिका पदाधिकाऱ्यांनी भुजबळ फार्मवर जाऊन त्यासाठी भुजबळ यांना साकडे घातले आणि मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्यासाठी विनंती केली. त्यानुसार भुजबळ यांनी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली व महापौर, स्थायी समितीचे सभापती, सभागृह नेते गटनेते असे मनसेचे सर्व पदाधिकारी शनिवारी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटले. विशेष म्हणजे याभेटीप्रसंगी भाजपाचे नाशिक शहरातील एकही आमदार उपस्थित नव्हते. या सर्वांना कळविण्यात आले होते; परंतु सर्वच जण आपापल्या कामात व्यस्त होते, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.मनसेचे महापौर अशोक मुर्तडक आणि शहराध्यक्ष तथा स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका करणारे मनसेचे गटनेते अशोक सातभाई हेदेखील मुंबईत भुजबळ यांच्या नेतृत्वाखालीच मुख्यमंत्र्यांना भेटले. तथापि, भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन दिली आणि ते स्वत: तेथे उपस्थित आहेत, याबाबत अंधारात ठेवण्यात आले होते, असे सातभाई म्हणाले. राष्ट्रवादीचे पंचवटी विभाग अध्यक्ष देवांग जानी यांनी मनसे गटनेता सातभाई संकुचित असल्याची टीका केली आहे. भुजबळ यांनी बांधकाम विभागामार्फत ६६४ कोटी रुपयांची कामे केली असून, त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आहे. कुंभमेळा हा आंतरराष्ट्रीय सोहळा असून, सर्वजण एकत्र आले तरच तो होऊ शकतो, असे असताना मनसेचे गटनेता संकुचित वृत्ती दाखवत असल्याचे जानी यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)