नाशिक : स्थानिक व्यापारी संघटना व संघटनेचे सभासद नसल्याच्या कारणावरून गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव ठप्पचा तिढा चौथ्या दिवशीही कायम राहिला. सायंकाळी उशिरापर्यंत व्यापारी संघटना, बाजार समिती पदाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्यातील बैठकीच्या चर्चेत कोणताही तोडगा निघू शकला नाही. स्थानिक व्यापारी संघटनेचे सभासद नसल्याचे कारण देत २२७ व्यापाऱ्यांनी कांदा लिलावात सहभाग न घेतल्याने तीन दिवसांपासून लासलगाव बाजार समिती व विंचूर व निफाड उपबाजार येथील कांदा लिलाव होऊ शकले नाहीत. येथील जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांच्या उपस्थितीत या व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची तसेच लासलगााव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील व सचिव बी. वाय. होळकर तसेच बाजार समितीचे अधिकारी यांची बैठक जिल्हा उपनिबंधक कार्यालयात झाली. त्यात जिल्हा उपनिबंधकांनी व्यापाऱ्यांना काही पर्याय सुचविले होते. आपला थोडासा अहंम भाव बाजूला ठेवून आधी लिलाव सुरू करावेत, त्यानंतर या विषयावर तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले; मात्र त्याला व्यापारी संघटनेने दाद दिली नसल्याचे कळते. त्यामुळे ही बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली. या बैठकीनंतर सभापती नानासाहेब पाटील यांनी रात्री उशिरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक घेऊन त्यात या समस्येवर तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
बैठक निष्पळ; लासलगाव बाजार समितीचा तिढा कायम
By admin | Updated: November 21, 2014 00:34 IST