पिंपळगाव टोलनाक्याच्या वाढीव दराबाबत बैठक
By Admin | Updated: December 4, 2014 23:51 IST2014-12-04T23:51:01+5:302014-12-04T23:51:53+5:30
जिल्हाधिकारी : नाशिक, मालेगावकरांचा विरोध कायम

पिंपळगाव टोलनाक्याच्या वाढीव दराबाबत बैठक
नाशिक : पिंपळगावजवळील टोलनाक्याचे दर वाढविण्यात यावेत अशी मागणी पीएनजी कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे केली होती. याबाबत दिल्लीत नुकतीच बैठक घेण्यात आली असून, दरवाढीला नाशिक, मालेगावकरांचा विरोध कायम असल्याचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी निर्दशनास आणून दिले. गेल्या काही महिन्यांपासून पिंपळगावजवळील टोलनाक्याचे दर वाढविण्याबाबतचा विचार पीएनजी कंपनीकडून केला जात होता. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणीदेखील करण्यात आली होती; परंतु यास नाशिक व मालेगावमधील वाहनधारकांचा विरोध असल्याने टोल दरवाढ करण्याबाबत बैठकांवर बैठका घेण्यात येत होत्या. दिल्लीत नुकतीच याबाबत बैठक घेण्यात आली असून, बैठकीला जिल्हाधिकारी विलास पाटील उपस्थित होते. त्यांनी टोल दरवाढीला होत असलेल्या तक्रारींचा पाढा वाचून दाखविल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या दरवाढीचा ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे पिंपळगाव टोलनाक्याचे दर ‘जैसे थे’ असल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)